जिल्हा
डेंग्यूने घेतला इंजिनियर तरुणीचा बळी
कल्याण : कल्याणजवळील मोहने येथील इंजिनीयर असलेल्या प्राची तरे (२०) या युवतीला डेंग्यू झाल्याचे रक्त तपासणीमध्ये निष्पन्न झाले असतानाच तिचे सोमवारी उपचार सुरू असतानाच निधन झाल्याची घटना घडली आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील गेल्या तीन महिन्यात नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गहन होत चालला आहे. गॅस्ट्रो, कावीळ, टायफाईड, डेंगू, लेप्टो, मलेरिया तसेच ताप येणाऱ्या रुग्णात होत असणारी वाढ चिंताजनक असून एच3, एन2 या आजाराशी बाधित झालेले रुग्ण मिळून आल्याने पालिकेचे शास्त्रीनगर व रुक्मिणीबाई रुग्णालय उपचाराकरिता रुग्णांनी खचाखच भरून टाकले आहे.
पावसाळा सुरू झाल्यानंतर रुग्णसंख्येत भरमसाठ वाढ झाल्याचे दिसून येत आहे. शहरातील अनेक भागात तुंबलेल्या गटारी नाले तसेच फुटलेल्या जलवाहिन्या यामुळे डासांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आतापर्यंत महापालिका क्षेत्रात १४४०३ रुग्ण तापाचे आढळून आले आहेत.
कॉलरा, स्वाइन फ्लू, चिकन गुनियाने एकही रुग्ण बाधित झाला नसल्याचे यावेळी वैद्यकीय विभागाकडून सांगण्यात आले आहे. मात्र गेल्या तीन महिन्याच्या कालावधीत गॅस्ट्रोचे ५६, कावीळ ४५, टायफाईड ११८, डेंग्यू ९६, लेप्टो १२, मलेरिया ५१, एच3 एन2, दहा तर तापाने फणफणलेले १४ हजार ४०३ रुग्ण तपासात आढळून आले आहेत.
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून तीन लाख २४,३६७ घरांचे सर्वेक्षण केले गेले असून यात किमान दोन लाख लोकांचे सर्वेक्षण यावेळी करण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने ८४८९ रक्त नमुने ६२६ पाणी नमुने घेण्यात आले होते. तपासणीत ४४० योग्य तर ३२ अयोग्य आढळल्याचे दिसून आले होते. महापालिका क्षेत्रातील झोपडपट्टी विभागात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असल्याने आजाराचे लागण झालेले रुग्ण वाढीचे प्रमाण अधिक गतीने वाढताना दिसून येत आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600