जिल्हा

चरीव शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप

चरीव शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप
चरीव शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप फोटो: ठाणे वैभव
रोटरी क्लब ऑफ मुंबई बीकेसीचा उपक्रम
शहापूर: रोटरी क्लब ऑफ मुंबई बीकेसी यांच्या सौजन्याने जिल्हा परिषद शाळा चरीव येथे विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या उपक्रमांतर्गत बाहेरच्या पाडे-वस्त्यांवरून येणाऱ्या तसेच शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षेत यश मिळवलेल्या २० विद्यार्थ्यांना सायकलींचे वितरण करण्यात आले. लर्निंग लिंक्स फाऊंडेशन, मुंबई या संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये विविध कंपन्यांच्या सहकार्याने चरीव शाळेत शैक्षणिक व भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. यामध्ये स्मार्ट डिजिटल बोर्ड, दर्जेदार सोलर पॅनेल, अत्याधुनिक प्रयोगशाळा, विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ग्रंथालय अशा सुविधा उभारण्यात आल्या असून त्यामुळे चरीव शाळा तालुक्यातील दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित जिल्हा परिषद शाळा म्हणून ओळख निर्माण करत आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष दशरथ साबळे यांनी भूषवले. तर प्रमुख पाहुणे म्हणून ‘सोलर मॅन ऑफ इंडिया’ व रोटरी क्लब मुंबई बीकेसीचे माजी अध्यक्ष डॉ.सचिन शिगवण तसेच रोटरी क्लब मुंबई बीकेसीचे अध्यक्ष सुयोग गंगावणे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सायकलींचे वितरण करण्यात आले. यावेळी पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत चरीव शाळेचे विशेष कौतुक केले. ठाणे-पालघर जिल्ह्यातील ३६ शाळांमध्ये असे उपक्रम राबविले जात असले तरी चरीव शाळा विशेष भावल्याचे त्यांनी नमूद केले.तसेच शाळेसाठी कूलर फिल्टर व उर्वरित विद्यार्थ्यांना सायकली उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
मुख्याध्यापक तानाजी घायवट यांनी मनोगतात शाळेची प्रगती यापुढेही अशाच वेगाने सुरू राहील, असा विश्वास व्यक्त करत ग्रामस्थांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य संतोष पानसरे, मोहन पानसरे, निलेश कथोरे, मिनाक्षी पानसरे तसेच शिक्षक मल्हारी विशे, सदाशिव सातपुते, शरद गायकवाड यांसह पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशवंत केदार यांनी केले तर सुनील रिकामे यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600