जिल्हा
यशस्वी बीएलओंचा जिल्हाधिकारी करणार गौरव
यशस्वी बीएलओंचा जिल्हाधिकारी करणार गौरव
फोटो: ठाणे वैभव
ठाणे : ठाण्यात विशेष सखोल पुनरावलोकन (एसआयआर) मोहिमेला गती मिळावी याकरिता भाजप नगरसेवक सीताराम राणे यांनी पुढाकार घेतला आहे. ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ५ मध्ये एसआयआर अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी सीताराम राणे यांचे कार्यकर्ते व सहकारी बीएलओच्या दिमतीला सरसावले आहेत. या मोहिमेत ७५ ते ८० टक्क्यांपेक्षा अधिक नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या बीएलओंचा ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती सीताराम राणे यांनी दिली.
ठाण्यात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकन (एसआयआर) मोहिम राबवण्यात येत आहे. मतदार नोंदणीचे काम वेळेत आणि अधिक प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी सीताराम राणे यांनी भाजपचे कार्यकर्ते व सहकाऱ्यांना शासन नियुक्त बीएलओच्या मदतीकरीता नियुक्त केले आहे. राणे यांच्या शिवाईनगर येऊर प्रभाग क्रमांक ५ मध्ये एकूण ४३ मतदान केंद्रे असून प्रत्येक केंद्रासाठी नियुक्त करण्यात आलेले बीएलओ मतदारांच्या घरोघरी जाऊन पडताळणी व नोंदणीचे काम करत आहेत. विविध राजकीय पक्षांकडून बीएलए यांची नियुक्ती करण्यात आली असली तरी प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचताना मर्यादित मनुष्यबळामुळे बीएलओंसाठी आव्हानात्मक ठरत आहे. ही बाब लक्षात घेऊन नगरसेवक सीताराम राणे यांनी बीएलओंना अतिरिक्त कुमक देण्याचा निर्णय घेतला आहे.
राणे यांनी सांगितले की, त्यांच्या प्रभागातील प्रत्येक बूथवर काम करणाऱ्या बीएलओंना आवश्यक त्या ठिकाणी कार्यकर्ते आणि सहकारी मदतीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या संदर्भात मतदार नोंदणी अधिकारी आणि प्रभागातील बीएलओ यांची संयुक्त बैठक घेऊन आवश्यक सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे विशेष सखोल पुनरावलोकन मोहिमेअंतर्गत जास्तीत जास्त मतदारांची नोंदणी वेळेत पूर्ण होण्यास मदत होईल.
विशेष सखोल पुनरावलोकन मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी करत ७५ ते ८० टक्क्यांपेक्षा अधिक नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या शासकीय बीएलओंचा ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी यांनाही अवगत केल्याची माहितीही राणे यांनी दिली. या उपक्रमामुळे बीएलओंचा उत्साह वाढण्याबरोबरच विशेष सखोल पुनरावलोकन मोहिमेलाही अधिक वेग मिळेल आणि मतदार नोंदणीचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण होण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास नागरीकांकडून व्यक्त होत आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600