जिल्हा
टीएमटी पाससाठी सहा महिने हेलपाटे
टीएमटी पाससाठी सहा महिने हेलपाटे
फोटो: ठाणे वैभव
भर पावसात ज्येष्ठ नागरिकांची फरफट
ठाणे : ठाणे परिवहन सेवेच्या ढिसाळ कारभारामुळे ज्येष्ठ नागरिकांना भर पावसात तासन्तास रांगेत उभे राहूनही पास मिळत नसल्याचा गंभीर आरोप ठाणे काँग्रेसने केला आहे. ठाणे रेल्वे स्थानकावरील सॅटीसपुलावरील पास वितरण केंद्राला अचानक भेट देत त्यांनी परिवहन प्रशासनाच्या निष्काळजीपणावर जोरदार टीका केली.
यावेळी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी पिंगळे यांच्यासमोर तक्रारींचा अक्षरशः पाऊस पाडला. बसण्याची व्यवस्था नाही, पिण्याचे पाणी नाही, पावसापासून संरक्षणासाठी छत नाही. अर्ज मंजूर झाल्यानंतर एका महिन्यात मिळायला हवा असलेला डिजिटल पास सहा ते सात महिने उलटूनही मिळत नसल्याने वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याची व्यथा नागरिकांनी मांडली. स्वातंत्र्यसैनिकांकडूनही पाससाठी शुल्क आकारले जात असल्याचा आरोपही करण्यात आला. याबाबत उपस्थित परिवहन अधिकाऱ्यांना जाब विचारला असता, पास वितरणाचे काम खासगी कंपनीकडे असल्याचे सांगण्यात आले. कंपनीशी संपर्क साधल्यानंतर सध्या नगरसेवकांकडून आलेले २०० ते ३०० पास तयार करण्याचे काम सुरू असल्याचे उत्तर देण्यात आले.
या संपूर्ण प्रकारावर संताप व्यक्त करत ठाणे शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी लवकरच परिवहन व्यवस्थापकांची भेट घेऊन सर्व समस्या त्यांच्या निदर्शनास आणणार असल्याचे सांगितले. तसेच ज्येष्ठ नागरिकांना वारंवार पास काढण्याचा त्रास होऊ नये म्हणून पासची वैधता पाच वर्षांची करण्याची मागणीही करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600