जिल्हा
बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे दिवा जाणार पाण्याखाली
बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे दिवा जाणार पाण्याखाली
फोटो: ठाणे वैभव
सत्ताधारी शिवसेना नगरसेवकांकडून भीती
ठाणे : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या दिवा परिसरातील सुरू असलेल्या कामांमुळे पावसाळ्यात पूरस्थिती अधिक गंभीर होऊन दिवा परिसर पाण्याखाली जाण्याची शक्यता असल्याची चिंता ठाणे महापालिकेच्या महासभेत सत्ताधारी नगरसेवकांनी व्यक्त केली. प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या भराव, तात्पुरते रस्ते आणि बांधकामामुळे नैसर्गिक पाण्याचा निचरा होत नसल्याचा आरोप करत याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याची मागणी करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून बुलेट ट्रेनकडे पाहिले जाते. ठाणे महापालिका क्षेत्रातील म्हातारडी येथे बुलेट ट्रेनचे स्थानक उभारण्यात येत आहे. मात्र आता बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे दिवा परिसरात वाढत असलेला पूर धोका अधिक गंभीर समस्या बनत असल्याची लक्षवेधी शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नगरसेवक रमाकांत मढवी यांनी मांडली. त्याला जेष्ठ नगरसेवक राम रेपाळे यांनी अनुमोदन दिले दिवा आणि आसपासच्या सखल भागात दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचत असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामांनंतर ही समस्या अधिक तीव्र झाल्याच्या नागरिकांच्या तक्रारी असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे, युवा नगरसेविका साक्षी मढवी, दर्शना म्हात्रे, दिपक जाधव आणि बाबाजी पाटील यांच्यासह नगरसेवकांनी या विषयावर महासभेत चर्चा केली. पावसाचे पाणी वाहून जाणाऱ्या नैसर्गिक मार्गांवर परिणाम झाल्यास भविष्यात मोठ्या प्रमाणात नागरिकांना फटका बसू शकतो, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने राष्ट्रीय हायस्पीड रेल कॉर्पोरेशन आणि संबंधित यंत्रणांकडून वस्तुस्थितीचा अहवाल मागवावा, तसेच पाणी निचऱ्याच्या व्यवस्थेची संयुक्त पाहणी करावी, अशी मागणी सदस्यांनी केली. नगरसेवकांनी नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत, प्रकल्पाच्या कामांमुळे पूरस्थिती निर्माण होत असल्यास त्यावर तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात, अशी भूमिका घेतली. भविष्यात अतिवृष्टीच्या काळात कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय आवश्यक असल्याचेही सभागृहात नमूद करण्यात आले.
दरम्यान, प्रशासनाकडून या मुद्द्याची दखल घेत संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून वस्तुस्थिती तपासली जाईल आणि आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले. जमिनी असलेल्या शेताकऱ्यांची सुनावणी नाशिक, पुणे, संभाजी नगर येथे ठेऊन शेतकऱ्यांना नाहक त्रास दिला जात असल्याचा आरोप श्री मढवी यांनी केला शेतकऱ्यांना मोबदला न देत दलाल यांना हाताशी पकडून काही अधिकारी शेतकऱ्यांना त्यांच्या हक्का पासून वंचित ठेवत असल्याचे श्री मढवी यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले.
चर्चेदरम्यान रमाकांत मढवी यांनी विकासाला विरोध नसल्याचे स्पष्ट करत, विकासाच्या नावाखाली स्थानिकांवर अन्याय होऊ नये, अशी भूमिका मांडली. प्रकल्पासाठी अनेक वर्षे वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या चाळी हटविण्यात आल्या असून काहींना मोबदला मिळाला असला तरी पुनर्वसन आणि मूलभूत सुविधांचे प्रश्न कायम असल्याचे त्यांनी सांगितले. दिवा-बेटवडे गावाकडे जाणारा विद्यमान रस्ता बंद करून पर्यायी अरुंद मार्ग तयार करण्यात आल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत असल्याचाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला.
बुलेट ट्रेन स्थानक उभारले जात असताना दिवा-माजीवडा, दिवा-तळोजा, दिवा-पनवेल, दिवा-बदलापूर आणि भिवंडी या भागांना जोडणारे सक्षम संपर्क मार्ग उभारावेत, अशी मागणीही करण्यात आली. तसेच जमीन गमावणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ आर्थिक मोबदला न देता स्थानक परिसरातील व्यावसायिक संधी, दुकाने आणि रोजगारात प्राधान्य देण्यात यावे, अशी भूमिका यावेळी नगरसेवकांनी मांडली.
या लक्षवेद्धीवर चर्चा सुरु असताना श्री. मढवी यांना वेळेची मर्यादा पाळण्याचे आवाहन महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केले असता श्री. मढवी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी वेळ जास्त पाहिजे असल्याचे सांगितले. तुम्ही वेळ देणार नसाल तर शेतकऱ्यांसाठी आम्ही सर्व नगरसेवक पदाचा राजीनामा देऊ असे सांगताच त्यांना अधिक वेळ देण्यात आली.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600