जिल्हा
ठामपाच्या खांद्यावर विशेष वसाहतींचे नाहक ओझे!
ठामपाच्या खांद्यावर विशेष वसाहतींचे नाहक ओझे!
फोटो: ठाणे वैभव
महापालिकेने दहा वर्षे उचलला घनकचरा विल्हेवाटीचा कोट्यवधींचा खर्च
ठाणे : विशेष नागरी वसाहती म्हणून राज्य शासनाकडून परवानगी मिळालेल्या मोठमोठ्या गृहसंकुलांनी सोसायटीमध्ये निर्माण होणाऱ्या कचऱ्याची व्हिलेवाट स्वखर्चाने लावण्याची सक्ती असतानाही गेली दहा वर्षे करोडो रुपये खर्चाचा बोजा ठाणे महापालिकेवर पडत असल्याची बाब एका जागरूक नगरसेवकाने महासभेत महापालिकेच्या निदर्शनास आणून दिली. हा खर्च महापालिका या गृहसंकुलांकडून वसुल करते का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत प्रश्नोत्तराच्या तासात भाजपचे नगरसेवक दिपक जाधव यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. घोडबंदर मार्गांवरील या दोन गृहसंकुलांना विशेष नगर वसाहतीच्या माध्यमातून परवानगी मिळाली आहे. या गृहसंकुलांना मंजुरी देताना त्यांनी त्यांच्या हद्दीत निर्माण होणाऱ्या घनकचरा आणि मलनिस्सारण व्यवस्थापन स्वखर्चाने करण्याची अट घातली होती.
नगरसेवक दीपक जाधव यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, माजिवड्यातील एका गृहसंकुलामध्ये दररोज १० ते १२ मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. या कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी पालिकेला दोन फेऱ्यांसाठी ८,८०८ रुपये खर्च करते तर, दुसरीकडे कोलशेत आणि कावेसर परिसरातील गृहसंकुलामध्ये दैनंदिन २८ ते ३० मेट्रिक टन कचऱ्याची निर्मिती होते. या कचऱ्याच्या वाहतुकीसाठी सात फेऱ्यांसाठी प्रति सत्र ६,६१२ रुपये खर्च करते. म्हणजे प्रति सत्र या दोन गृहसंकुलातून कचरा वाहतुकीसाठी ठाणे पालिकेच्या तिजोरीतून दर महिना सुमारे साडेचार लाखांहून अधिक रक्कम खर्च होत आहे.
हा कचरा दोन ते तीन सत्रामध्ये उचलला जात असेल तर हा खर्च दुप्पट तिप्पट होत असल्याची शक्यता आहे. म्हणजे केवळ या दोन गृहसंकुलांच्या कचरा वाहतुकीसाठी ठाणे महापालिका वर्षाला साठ लाखांपर्यंत खर्च करत असल्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे, या परिसरात शंभर टन प्रतिदिन क्षमतेचे जैववायू आणि यांत्रिक खतनिर्मिती प्रकल्प उभारण्याची संकल्पना असतानाही ते प्रभावीपणे कार्यान्वित नसल्याने कचरा स्थानिक पातळीवर प्रक्रिया न होता थेट वाहून नेला जात आहे. त्यामुळे वाहतूक खर्च वाढत असून विकेंद्रित कचरा व्यवस्थापनाचा उद्देशही साध्य होत नसल्याची टीका होत आहे.
बांधकाम व पाडकाम कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी नियुक्त केलेल्या कंपनीमार्फत जून २०२६ अखेर ५१ हजार ४१ मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आली आहे. या माध्यमातून महापालिकेच्या खात्यात ६ कोटी ४५ लाख ८२ हजार ३२८ रुपये जमा झाले आहेत. शहरातील भाईंदरपाडा, आनंदनगर, वागळे इस्टेट, नाशिक महामार्ग, रुस्तमजी आणि साकेत रोड येथे कचरा संकलन केंद्रे उभारण्यात आली असली, तरी प्रक्रिया केलेल्या साहित्याचा पुनर्वापर किती प्रमाणात होतो, याबाबत स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600