जिल्हा
घाबरू नका, सतर्क राहा! - आयुक्त
घाबरू नका, सतर्क राहा! - आयुक्त
फोटो: ठाणे वैभव
ठामपा क्षेत्रात कोरोनाचे १० रुग्ण
घरीच उपचार सुरू, गंभीर लक्षणे नाहीत
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात विशेष कक्ष तयार
ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या तीन दिवसात कोरोनाचे १० रुग्ण आढळले असून सौम्य लक्षणे दिसून आल्याने रुग्णांवर घरीच उपचार सुरू आहेत. दरम्यान, कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने तसेच सर्व रुग्णालयांनी सतर्क रहावे, असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. तसेच, कळवा येथे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे.
कोरोना रुग्ण आढळण्यास सुरूवात झाल्याच्या पार्श्वभूमीवर, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी शुक्रवारी विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत महापालिका क्षेत्रातील कोरोना रुग्ण स्थितीची माहिती घेतली. शुक्रवारपर्यंत महापालिका क्षेत्रात कोरोनाचे १० रुग्ण आढळले. त्यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षणे आढळली असून त्या सर्व रुग्णांवर घरीच उपचार करण्यात येत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी चेतना नितील यांनी या बैठकीत दिली. त्याचबरोबर, सर्व आरोग्य केंद्रात पुरेसा औषध साठा उपलब्ध असून तेथे टेस्टिंग कीटही आहेत, असेही त्यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे कोरोनाच्या रुग्णांसाठी १९ खाटांचा स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आल्याची माहिती रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांनी दिली. आरटीपीसीआरची सुविधाही कळवा येथे उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
सिव्हिलमध्ये ४० खाटांचे विशेष कक्ष तयार
आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर
ठाणे : जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूच्या नवीन व्हेरिएंटमुळे पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. त्यामुळे भारतातही सतर्कता वाढवण्यात आली असून पुणे, मुंबई पाठोपाठ ठाण्यातही करोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे सिव्हिल रुग्णालयात ४० खाटांचे विशेष कक्ष तातडीने तयार करण्यात आला असून यामध्ये रुग्णांना लागणाऱ्या सर्व वैद्यकीय यंत्रणा ठेवल्या आहेत.
ठाणे सिव्हिल रुग्णालयात ४० खाटांचे विशेष कक्ष तातडीने तयार करण्यात आले आहे. हा कक्ष पूर्णपणे वातानुकूलित असून त्यामध्ये आवश्यक सर्व वैद्यकीय उपकरणे उपलब्ध आहेत. डॉक्टर, नर्सेस आणि सहाय्यक कर्मचारी यांची स्वतंत्र नियुक्तीही करण्यात आली आहे. याशिवाय, रुग्णांच्या चाचण्या, विलगीकरण आणि औषधोपचारासाठी स्वतंत्र सुविधा विकसित करण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. आरोग्य यंत्रणांनी सर्व नागरिकांना पुन्हा एकदा मास्कचा वापर करण्याचे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्याचे, हात स्वच्छ ठेवण्याचे आणि लक्षणे आढळल्यास त्वरित तपासणी करून उपचार घेण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांची सतर्कता आणि सहकार्य हेच कोरोनाच्या संभाव्य लाटेला थोपवू शकते. (डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्य चिकित्सक ठाणे )
शहरातील शाळा, महाविद्यालये, कार्यालये, मॉल्स आणि बाजारपेठांमध्येदेखील मास्क व सॅनिटायझर वापरासंबंधी सूचना दिल्या गेल्या आहेत.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600