जिल्हा
पाणीटंचाईविरोधात देवांनीच घेतली आयुक्तांकडे धाव
पाणीटंचाईविरोधात देवांनीच घेतली आयुक्तांकडे धाव
फोटो: ठाणे वैभव
मीरा भाईंदरमध्ये मनसेचे अनोखे आंदोलन
भाईंदर : मीरा-भाईंदर शहरातील वाढती पाणीटचाई आणि वारंवार उद्भवणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त असताना, या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) मीरा-भाईंदर मुख्यालयात आगळेवेगळे आंदोलन छेडले. मनसेच्या कार्यकर्त्यांनी विविध देवतांचे वेश परिधान करून महानगरपालिका परिसरात प्रवेश करत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना थेट जाब विचारण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनाचे नेतृत्व मनसेचे शहराध्यक्ष संदीप राणे यांनी केले.
शहरातील नागरिकांना नियमित आणि पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होत नसल्याने अनेक भागांमध्ये तीव्र नाराजी आहे. पाणीपुरवठ्यातील अनियमितता, कमी दाबाने येणारे पाणी, काही भागांमध्ये दिवसेंदिवस वाढणारी टंचाई आणि प्रशासनाचा ढिसाळ कारभार याविरोधात मनसेने हे अनोखे आंदोलन उभारले. यावेळी संदीप राणे यांनी प्रशासन, महापौर आणि निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवर जोरदार टीका केली. "शहरातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यात प्रशासन, महापौर आणि नगरसेवक पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. अनेक वेळा पाठपुरावा करूनही नागरिकांना कोणताही दिलासा मिळालेला नाही," असे ते म्हणाले.
आंदोलनादरम्यान त्यांनी उपरोधिक शैलीत प्रशासनावर निशाणा साधला. “जेव्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना पाण्याच्या समस्येवर कोणताही ठोस तोडगा काढता येत नाही, तेव्हा आता हा प्रश्न सोडवण्यासाठी देवांनाच अवतार घ्यावा लागत आहे. त्यामुळे आज साक्षात देवच महापालिकेत नागरिकांच्या वतीने जाब विचारण्यासाठी आले आहेत," असे वक्तव्य त्यांनी केले.
मनसेच्या या अनोख्या आंदोलनामुळे महानगरपालिका परिसरात काही काळ वेगळेच वातावरण निर्माण झाले. देवतांच्या वेशातील कार्यकर्त्यांकडे नागरिक, कर्मचारी आणि येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधले गेले. अनेकांनी या आंदोलनाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्याने त्याची चर्चा शहरभर रंगली.
मनसेने प्रशासनाला पाणीप्रश्नावर तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. भविष्यातही नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्यास अधिक तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा पक्षाकडून देण्यात आला आहे. शहरातील नागरिकांना नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठा मिळावा, यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600