जिल्हा
दिव्यातील औषधांची दुकाने फार्मासिस्टविना !
दिव्यातील औषधांची दुकाने फार्मासिस्टविना !
फोटो: ठाणे वैभव
ठाणे : दिवा शहरातील अनेक मेडिकल स्टोअरमध्ये फार्मासिस्ट नसल्याने या भागातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ठाणे महानगरपालिकेने या दुकानांची तत्काळ तपासणी मोहीम हाती घ्यावी, असा प्रस्ताव नगरसेविका साक्षी मढवी यांनी आगामी महासभेत मांडला आहे.
शिवसेना शहरप्रमुख, नगरसेवक रमाकांत मढवी यांनी दिवा शहरातील बोगस डॉक्टरांचा विषय महासभेत घेतल्यानंतर येणाऱ्या आगामी महासभेत नगरसेविका साक्षी मढवी यांनी दिवा शहरातील औषध विक्रीचा विषय चर्चेला आणला आहे. औषध विक्री हा नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित विषय असून प्रत्येक मेडिकल स्टोअरमध्ये पात्र आणि नोंदणीकृत फार्मासिस्ट उपस्थित असणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र दिवा शहरातील अनेक औषध विक्री दुकानात या नियमाचे काटेकोर पालन होत आहे की नाही, याबाबत नागरिकांमध्ये शंका व्यक्त केली जात आहे. काही ठिकाणी फार्मासिस्टच्या अनुपस्थितीत औषध विक्री होत असल्याच्या तक्रारी देखील समोर येत आहेत.
या पार्श्वभूमीवर नगरसेविका साक्षी मढवी यांनी महासभेत प्रस्ताव मांडत संबंधित विभागामार्फत विशेष तपासणी मोहीम राबविण्याची मागणी केली आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मेडिकल स्टोअर्सवर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी केली.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600