जिल्हा
शेतकऱ्यांच्या बॅगा तयार; मात्र विमान टेकऑफ घेईना !
शेतकऱ्यांच्या बॅगा तयार; मात्र विमान टेकऑफ घेईना !
फोटो: ठाणे वैभव
शेतकरी परदेशी अभ्यास दौ-याच्या प्रतिक्षेत
शहापूर : शेतक-यांना परदेशी शेतीचा अभ्यास व्हावा, तेथील प्रयोग राज्यातही केले जावेत, या हेतुने शासनाने परदेशात कृषी पर्यटनासाठी शेतकऱ्यांची निवड केली; पण आठ महिन्यांनंतरही परदेशात जाणाऱ्या विमानाने टेक ऑफ केले नसल्याने परदेश अभ्यास दौऱ्यासाठी निवड झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून ठेंगा दाखवल्याची भावना पात्र शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
या दौऱ्यासाठी राज्यातील एकुण १६० शेतकऱ्यांपैकी ठाणे जिल्ह्यातील तीन पात्र शेतक-यांसह रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, पालघर या जिल्ह्यातील १४ शेतकरी या अभ्यास दौऱ्यात सहभागी आहेत.
परदेशी शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान, कृषिमाल प्रक्रिया व पुरवठा साखळी यांची माहिती महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना व्हावी यासाठी कृषी विभागामार्फत हा दौरा आयोजित करण्यात आला. निधी उपलब्ध होऊनही वर्षभर दौरा अधांतरीच राहिल्याने शेतकरी संभ्रमात आहेत. राज्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी विविध देशातील विकसित आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी शेतकऱ्यांचे दौरे आयोजित केले जातात. २००५ पासून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये शेतमालाची निर्यात, कृषी माल प्रक्रिया तसेच विविध देशातील तंत्रज्ञान अवगत करण्याची संधी मिळते. तर त्याचा वापर शेतकरी शेतात करू शकतील, असा उद्देशही या दौऱ्यामागे असतो.
परदेशात जाऊन आधुनिक व नवनवीन तंत्रज्ञान शिकण्याच्या उद्देशाने शासनाकडून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून परदेश अभ्यास दौऱ्यासाठी जानेवारी २०२४ मध्ये शेतक-यांकडून पासपोर्टसहित सर्व माहिती मागवून सात महिन्यानंतरही शासनाने कोणताही निर्णय घेतला नसल्याने हा अभ्यास दौरा का रखडला याची चौकशी होणे गरजेचे आहे. तर पासपोर्ट काढणे आणि त्यासाठी झालेला खर्च आणि मेहनत पाण्यात जाते काय अशी शंका शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. दरम्यान नियोजित यात्रा घेऊन जाणाऱ्या कंपनीने युरोप दौरा करण्यास नकार दिल्याने हा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600