जिल्हा

जिल्हा न्यायालयातील जुन्या कॅन्टीनमध्ये घाणीचे साम्राज्य

जिल्हा न्यायालयातील जुन्या कॅन्टीनमध्ये घाणीचे साम्राज्य
जिल्हा न्यायालयातील जुन्या कॅन्टीनमध्ये घाणीचे साम्राज्य फोटो: ठाणे वैभव
वकिलांचा थेट तुकाराम मुंडेंकडे तक्रार अर्ज ​ठाणे: ठाणे जिल्हा न्यायालयाच्या जुन्या इमारतीमधील कॅन्टीनच्या अत्यंत दयनीय आणि आरोग्यास घातक असलेल्या अवस्थेविरोधात आता न्यायालयीन वकील वर्गाने आक्रमक पाऊल उचलले आहे. याप्रकरणी ठाणे कोर्टातील समस्त वकील वर्गाच्या वतीने अन्न व औषध प्रशासनाचे प्रमुख तुकाराम मुंडे आणि मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्याकडे थेट लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून, या कॅन्टीनवर तत्काळ धाड टाकून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. ​​ठाणे न्यायालयात वर्षभरापूर्वी नवी इमारत पूर्ण होऊन ती दिमाखात कार्यान्वित झाली असली, तरी वकील आणि पक्षकारांसाठी असणारी जुनी कॅन्टीन अजूनही बदलण्यात आलेली नाही. या कॅन्टीनची अवस्था सध्या अत्यंत गलिच्छ आणि मानवी आरोग्याला कमालीची धोकादायक बनली आहे. ​वकिलांच्या तक्रार अर्जानुसार कॅन्टीनच्या छतावर केवळ प्लास्टिकचे तात्पुरते आच्छादन असून पावसाचे पाणी गळत असल्याने संपूर्ण जमिनीवर चिखल आणि घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ज्या किचनमध्ये दैनंदिन अन्न आणि जेवण तयार केले जाते, ते अत्यंत अस्वच्छ आणि दूषित वातावरणात आहे. अन्न उघडे राहत असलेल्या या जागेत उंदीर, झुरळे आणि डासांचा प्रचंड सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे येथे कधीही मोठी साथ पसरण्याची किंवा विषबाधा होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. ​​न्यायालयाचे कामकाज सांभाळणाऱ्या शेकडो वकील बांधवांना नाइलाजाने याच दुर्गंधीयुक्त आणि हानिकारक वातावरणात जेवण करावे लागत आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या सर्व नियमांची येथे सरळसरळ पायमल्ली होत असून, हा सार्वजनिक आरोग्याशी अक्षम्य खेळ असल्याचा संताप वकील वर्गाने व्यक्त केला आहे. ​तातडीने 'रेड' मारण्याची मागणी ​या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन अन्न व औषध प्रशासनाचे कडक शिस्तीचे प्रमुख तुकाराम मुंडे साहेब आणि जिल्हा सत्र न्यायालय प्रशासनाने या कॅन्टीनवर अचानक धाड टाकावी, तेथील अन्नाचा दर्जा तपासावा आणि दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ठाणे जिल्हा न्यायालयातील समस्त वकील वर्गाने केली आहे. आता यावर एफडीए प्रशासन काय पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600