जिल्हा
भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात गढूळ पाणी पुरवठा
भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात गढूळ पाणी पुरवठा
फोटो: ठाणे वैभव
वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत क्लोरीन टॅब्लेटचे वाटप
भिवंडी: भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी घरगुती नळांना अशुद्ध, गढूळ व मातीमिश्रित पाणी येत असल्याच्या तक्रारी नागरिकांमधून वाढल्या आहेत.
शहरातील नागरिकांना सुरक्षित व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे तसेच पाण्याद्वारे पसरणाऱ्या आजारांपासून संरक्षण मिळावे या उद्देशाने भिवंडी महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभाग व पाणीपुरवठा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने क्लोरीन टॅब्लेट (२५ मिग्रॅ.) वॉटर प्युरिफायरचे घरोघरी मोफत वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने दिली आहे.
नागरिकांनी पिण्याच्या पाण्याच्या २० लिटर क्षमतेच्या बादली/पात्रामध्ये एक क्लोरीन टॅब्लेट टाकावी. टॅब्लेट पूर्णपणे विरघळल्यानंतर किमान ३० मिनिटांनी ते पाणी पिण्यास वापरावे. यामुळे पाण्यातील जंतूंचा नाश होऊन पाणी अधिक सुरक्षित होते, असे माहितीमध्ये नमूद केले आहे.
महानगरपालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना टॅब्लेटचा योग्य वापर कसा करावा, याबाबत मार्गदर्शनही करण्यात येणार आहे. सर्व नागरिकांनी या उपक्रमास सहकार्य करून क्लोरीन टॅब्लेटचा योग्य पद्धतीने वापर करावा व सुरक्षित पिण्याचे पाणी वापरून स्वतःचे व आपल्या कुटुंबाचे आरोग्य जपावे,असे आवाहन महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभाग व पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे. त्याच बरोबर या गोळीचे तोंडावाटे सेवन करू नये. ही क्लोरीन टॅब्लेट केवळ पिण्याचे पाणी शुद्ध करण्यासाठी आहे. ही गोळी औषध म्हणून वापरू नये. टॅब्लेट कोरड्या व थंड ठिकाणी, उष्णता व ओलाव्यापासून दूर ठेवावी. २० लिटर पाण्यासाठी फक्त एकच टॅब्लेट वापरावी. टॅब्लेट पाण्यात पूर्णपणे विरघळल्यानंतर किमान २ तासांनी ते पाणी पिण्यास वापरावे. टॅब्लेट लहान मुलांच्या आवाक्याबाहेर ठेवाव्यात, अशा सूचना भिवंडी महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.संदीप गाडेकर यांनी दिल्या आहेत.
मात्र ऐन पावसाळ्यात भिवंडीत अनेक ठिकाणी पालिकेच्या पाणीपुरवठ्यात गढुळ पाणी कोणत्या कारणाने येत आहे व ते कधी बंद होईल? याची माहिती महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने जाहीर केलेली नाही. तसेच याबाबत स्थानिक नगरसेवक पालिका अधिकाऱ्यांना जाब विचारणार काय?, अशा संतप्त भावना नागरिकांमधून उमटत आहेत.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600