जिल्हा
ज्यादा बसभाडे आकारणाऱ्या १२ खासगी बसचालकांना दंड
नवी मुंबई : गणेशोत्सवाकरीता कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची भाड्यापोटी लुटमार होऊ नये म्हणून आरटीओने खाजगी बस धारकांना दर पत्रक जाहीर केले होते. मात्र तरीही जादा भाडे आकारणाऱ्या १२ खासगी बसचालकांवर कारवाई करत आरटीओने ४१ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
मागील तीन दिवसांपासून आरटीओने महामार्गावर खासगी बसची तपासणी सुरू केली असून २७ पैकी १२ बसधारक निश्चित केलेल्या दरापेक्षा अतिरिक्त भाडे आकारणी करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. या बसवर दंडात्मक कारवाई करून ४१हजार रुपये दंड वसूल केला आहे.
सण-उत्सवात मुंबई, उपनगरातून मोठ्या संख्येने नागरिक गावी जात असतात. गौरी-गणपती सणात संख्या अधिक वाढते. विशेषतः कोकणात हा सण मोठ्या प्रमाणात साजरा होत असल्यामुळे जास्त लोक कोकणात जातात, मात्र गरजु प्रवाशांची संख्या पाहता खासगी बसंचालक मालक गेल्या काही वर्षांपासून सणांच्या तोंडावर पुरेपूर फायदा घेत आहेत. ऐन सणासुदीला हे खासगी बस धारक अव्वाच्या सव्वा दर आकारून प्रवाशांची लूट करतात. मात्र अशा या लूटमारीला आता आळा घालण्यासाठी वाशी उप प्रादेशिक कार्यालयाची या बसेसवर करडी नजर ठेवण्यात आली आहे. त्यासाठी पथके तयार केली असून अशा बसेसची तपासणी केली जात आहे.
तीन दिवसांपासून अशा खासगी बसेसची तपासणी करण्यात आली असून यात आतापर्यंत १२ बस दोषी आढळल्या असून त्यांच्यावर कारवाई करून ४१ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती वाशी उपप्रादेशिक अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी दिली आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600