जिल्हा
पाच फूट चॅनल कोसळला, सुदैवाने अनर्थ टळला!
पाच फूट चॅनल कोसळला, सुदैवाने अनर्थ टळला!
फोटो: ठाणे वैभव
लोखंडी कमान धोकादायक
ठाणे: ठाणे पूर्व मीठ बंदर रोडवरील स्वातंत्र्यवीर सावरकर नगर परिसरात ठाणे महापालिकेच्या निष्काळजीपणाचे अजून एक उदाहरण समोर आले आहे. महापालिकेने काही वर्षांपूर्वी उभारलेली लोखंडी कमान पूर्णपणे गंजून आता जीवघेणी ठरली आहे. मंगळवारी रात्री या कमानीचा पाच फूट लांबीचा लोखंडी चॅनल अचानक खाली पडला. सुदैवाने त्यावेळी कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र या घटनेने महापालिकेच्या निष्काळजीपणाची पोलखोल पुन्हा एकदा झाली आहे.
“महापालिका फक्त नवीन प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात व्यस्त असते, पण जुन्या रचनांची नियमित देखभाल करण्याकडे अजिबात लक्ष देत नाही. हा निष्काळजीपणा थेट नागरिकांच्या जीवाशी खेळणारा आहे.” परिसरातील रहिवाशांनी तातडीने या कमानीची तपासणी करून ती हटविण्याची मागणी केली आहे.
कमानीचा पाया आणि वरील रचना सर्वच बाजूंनी पूर्णपणे गंजल्यामुळे ती कोणत्याही क्षणी कोसळण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दररोज या मार्गावरून हजारो नागरिक, शाळकरी मुले आणि वाहनधारक जातात. त्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीदेखील आजवर महापालिकेकडून कोणताही अधिकारी घटनास्थळी पोहोचला नाही.
नागरिकांनी संताप व्यक्त करत म्हटलं, “महापालिका नागरिकांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करून फक्त दिखाऊ प्रकल्प, फलक आणि सेल्फी पॉईंटवर लक्ष केंद्रीत करते. मात्र या निष्काळजी प्रशासनामुळे कोणाचाही जीव गेला, तर जबाबदारी कोणाची?” दरम्यान, या प्रकरणात महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे “घटनेची माहिती घेत आहोत; आवश्यक ती कारवाई केली जाईल.”
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600