जिल्हा
उपमुख्यमंत्र्यांकडून शौर्या अंबुरे हिचा सत्कार
उपमुख्यमंत्र्यांकडून शौर्या अंबुरे हिचा सत्कार
फोटो: ठाणे वैभव
ठाणे : बहरीन येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत ठाणेकर धावपटू कुमारी शौर्या अंबुरे हिने 100 मीटर हर्डल्स (अडथळा शर्यत) स्पर्धेत रौप्य पदक पटकावत भारताचा आणि महाराष्ट्राचा अभिमान उंचावला आहे. तिच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर आज ठाण्यात शौर्याचे जोरदार स्वागत करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शौर्याचा सत्कार करण्यात आला. शिंदे यांनी शौर्याचे विशेष कौतुक करताना सांगितले की, “शौर्याने दाखवलेले धैर्य, मेहनत आणि क्रीडा कौशल्य हे ठाणे तसेच महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी आहे. तिच्या या यशामुळे देशाचे नाव उज्ज्वल झाले आहे.” शौर्याने या स्पर्धेत 13.73 सेकंदांचा वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवत रौप्य पदक मिळवले. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे भारताला आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत आणखी एक मानाचे पदक मिळाले.
सत्कार सोहळ्याला शौर्याचे प्रशिक्षक अजित कुलकर्णी, वडील पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे आणि आई पोलीस उपायुक्त रुपाली अंबुरे हेही उपस्थित होते. या प्रसंगी ठाणेकर नागरिकांनी तिच्यावर फुलांचा वर्षाव करत तिचे मनापासून अभिनंदन केले. पत्रकारांशी बोलताना शौर्याने सांगितले, “देशासाठी खेळण्याची आणि पदक जिंकण्याची संधी मिळाली हे माझ्यासाठी स्वप्नवत होतं. माझ्या कुटुंबीयांनी आणि प्रशिक्षकांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच मी हे यश मिळवू शकले. पुढेही भारतासाठी सुवर्णपदक मिळवण्याचे माझे लक्ष्य आहे.”
शौर्याच्या या यशामुळे ठाणे शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तिची जिद्द, शिस्त आणि कठोर मेहनत ही आजच्या पिढीतील युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरत आहे. ठाण्याच्या क्रीडा क्षेत्रातील हा अभिमानास्पद क्षण अनेक तरुणांना मोठी स्वप्ने पाहण्याची आणि त्यासाठी झटण्याची प्रेरणा देणारा ठरला आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600