जिल्हा
कचऱ्याचे ढीग मुंब्रा-कौसात; आंदोलन पेटले ठामपासमोर
कचऱ्याचे ढीग मुंब्रा-कौसात; आंदोलन पेटले ठामपासमोर
फोटो: ठाणे वैभव
* राष्ट्रवादीकडून आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या
* युवा आघाडीने मुख्यालयासमोर टाकला कचरा
ठाणे: गेल्या काही दिवसांपासून मुंब्रा आणि कौसा भागात कचरा उचलला जात नसल्याने सर्वत्र कचऱ्याचे ढीग लागले आहेत. परिणामी येथील आरोग्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या माजी नगरसेवकांनी आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले तर पक्षाच्या युवा आघाडीने ठामपा मुख्यालयाबाहेर कचरा आणून टाकत प्रशासनाचा निषेध केला.
गेल्या काही दिवसांपासून मुंब्र्यात कचऱ्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून कचरा उचलण्यात आलेला नाही. याबाबत तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी नगरसेवक शानू पठाण यांनी सुधीर भगत, फरजाना शाकीर शेख, सुनिता सातपुते, हिरा पाटील, रेहान पितलवाला, जमिला खान, कमरूल हुद्दा, नादीरा सुर्मे, शाकीर शेख यांच्यासह सर्व माजी नगरसेवकांनी ठामपा आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले. कचरा उचलला जात नसतानाही कंत्राटदार क्रिस्टल कंपनीला कोट्यवधी रूपये दिले जात आहेत. त्यामुळे या समस्येला ठामपाच जबाबदार आहे, असा आरोप या माजी नगरसेवकांनी केला.
आयुक्तांच्या बंगल्याबाहेर कचरा फेकण्याचा इशारा
डम्पिंग ग्राऊंड नसल्याचे कारण पुढे करीत ठेकेदारांकडून कचरा उचलला जात नाही. परिणामी कळव्याच्या विविध भागात कचरा साचू लागला आहे. अनेक सोसायट्यांच्या बाहेर कचरा जमा होत आहे. हा सर्व कचरा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अभिजीत पवार यांच्या नेतृत्वाखाली पूजा शिंदे-विचारे, कैलास हावळे, राजू शिंदे यांनी एका डंपरमध्ये आणून पालिका मुख्यालयासमोर ओतला. त्यामुळे पालिका परिसरात एकच खळबळ माजली. कचरा त्वरित उचलला नाही तर आयुक्तांच्या बंगल्यासमोर कचरा टाकण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600