जिल्हा
कल्याणमध्ये गुंडांचा तलवारी घेऊन वावर
व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला
कल्याण: कल्याण पूर्वेतील एका ३१ वर्षाच्या व्यावसायिकावर तलवार, मोठ्या सुऱ्याने हल्ला करुन त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार हल्लेखोरांनी व्यावसायिकाला ‘तू कोणत्याही पोलीस चौकीत जा, आमच्यावर काही होणार नाही,’ असे खुले आव्हान दिले. यामुळे हल्लेखोरांना पोलिसांचा धाक राहिला आहे की नाही असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. सोमवारी रात्री हा प्रकार घडला.
कल्याणमध्ये गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळेत तलवारी, सुऱ्यांनी हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. जुन्या वादाचे कारण पुढे करुन हे हल्ले केले जात आहेत. नसीम शेख (३१) हे व्यावसायिक कल्याण पूर्वेतील सूचकनाका भागात राहतात. काल रात्री ते घराजवळील रिक्षेत भोजन झाल्यावर बसले होते. त्यावेळी तेथे आरोपी इरफान पिरजादे, बाबा पठारे, सागर पावस्कर, राकेश गायकवाड हातात दांडके, तलवारी, सुरे घेऊन आले. त्यांनी नसीम यांच्या तलवारी, सुऱ्याने हल्ला चढविला. नसीम यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न सुरू असताना नसीम मोठ्या कौशल्याने त्यांच्या तावडीतून निसटले. ते गंभीर जखमी झाले. त्यावेळी इरफान पिरजादे याने नसीमला ‘तू कोणत्याही पोलीस चौकीत जा, आमचे कुठेही काहीही होणार नाही.’ असे बोलून शिवीगाळ केली. नसीमच्या पत्नीलाही मारण्याची धमकी इरफान यांनी दिली. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600