जिल्हा
अक्षय शिंदेचा एन्काऊंटर बनावट असल्याचा मुद्दा कसा वगळला?
अक्षय शिंदेचा एन्काऊंटर बनावट असल्याचा मुद्दा कसा वगळला?
फोटो: ठाणे वैभव
ठाणे सत्र न्यायालयाच्या भूमिकेवर हायकोर्टाची नाराजी
मुंबई : अक्षय शिंदेचं एन्काऊंटर बनावट असल्याचा ठपका ठेवत संबंधित पोलिस अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर सवाल उठवणारे अहवालातील दोन परिच्छेद कसे वगळले जाऊ शकतात? असा प्रश्न विचारत हायकोर्टाने ठाणे सत्र न्यायालयाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हे प्रकरण हायकोर्टात सुरू आहे याची ठाणे सत्र न्यायाधीशांना कल्पना दिली होती का? असा सवालही हायकोर्टाने राज्य सरकारला विचारला.
अक्षय शिंदेच्या बनावट चकमक प्रकरणी ठाणे सत्र न्यायालयाच्या भूमिकेवर हायकोर्टाने नाराजी व्यक्त केली. दंडाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालातील दोन प्रमुख मुद्दे कसे काय स्थगित केले जाऊ शकतात? असा सवाल विचारला. 5 मार्चच्या पुढील सुनावणीत राज्य सरकारने यावर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. याशिवाय याप्रकरणी जेष्ठ वकील मंजुला राव यांची अमायकस क्युरी म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत.
दंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालात अक्षय शिंदे एन्काऊंटर बनावट असल्याचा निर्वाळा देत संबंधित पोलिस अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले होते.
राज्य सरकारने सीआयडी चौकशी सुरू असल्याने अद्याप संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर अक्षय शिंदेच्या हत्येचा गुन्हा नोंदवलेला नाही. तसेच अण्णा शिंदे यांनी याप्रकरणी आता खटला चालवायचा नसल्याचे सांगितले आहे या मुद्यांवर अमायकस क्युरी हायकोर्टाला मदत करणार आहे.
अहवालात काय म्हटलंय?
बदलापूरमधील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर बनावट असल्याचे न्यायालयीन समितीने अहवालात म्हटले आहे. या बनावट चकमकीतील पाच पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या बळाचा गैरपद्धतीने वापर केला. त्यामुळे हे पाच पोलीस कर्मचारी अक्षय शिंदे याच्या मृत्यूसाठी जबाबदार आहेत, असे संबंधित अहवालात नमूद करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600