जिल्हा
नवी मुंबई आणि मीरा-भाईंदरमध्ये भाजपच्या हाती महापालिकेच्या तिजोऱ्या
अशोक पाटील आणि हसमुख गेहलोत सभापती
नवी मुंबई/ भाईंदर: अपेक्षेप्रमाणेच नवी मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी अशोक पाटील यांची निवड बिनविरोध होणार असून मीरा भाईंदर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी हसमुख गेहलोत यांची आज निवड झाली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीसह, परिवहन, महिला व बालकल्याण, आरोग्य, क्रीडा, पाणी पुरवठा आणि प्रभाग समित्याच्या सभापती पदासाठी बुधवार ४ मार्च रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. या निवडणुका बिनविरोध होणार असून उद्या गुरुवारी सभापतींची घोषणा करण्यात येणार आहे.
नवी मुंबई महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ६५ जागा जिंकत एकहाती सत्ता मिळविली आहे. तर एका अपक्षाने भाजपला साथ दिली आहे. महापौर, उपमहापौर, विरोधीपक्षनेता विराजमान झाल्यानंतर संख्याबळानुसार स्थायी समिती सदस्य निवडण्यात आले. मात्र, परिवहन समितीच्या १२ सदस्यांसाठी भाजप आणि शिवसेनेने अर्ज दाखल केले होते. तौलनिक संख्याबळानुसार परिवहन समितीची निवड न करता भाजपचे १२ जागांवर सभागृहात मतदान घेऊन सदस्य निवडले. विरोधीपक्षाने या विरोधात आवाज उठवत ही निवड चुकीची असून त्याला स्थगिती देण्याची मागणी लावून धरली आहे.
दरम्यान, परिवहन समिती बरोबरच विविध विषय समित्यांच्या सभापती पदी कुणाची वर्णी लागणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यानुसार बुधवारी (ता.४) अर्ज दाखल करण्यात आल्यानंतर गुरुवारी (ता.५) सभापतींची निवड केली जाणार आहे. मात्र, परिवहन समितीच्या सभापती पदावरुन विरोध सत्ताधार्यांना घेरण्यात यशस्वी होणार का? हे आज स्पष्ट होणार आहे.
दरम्यान मीरा-भाईंदर महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी भाजपचे गटनेते हसमुख गेहलोत यांची १३ विरुद्ध ३ मतांनी निवड करण्यात आली. कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नियुक्त केलेल्या पिठासीन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.
महापालिकेच्या निवडणुका पूर्ण झाल्यानंतर सत्तास्थापना झाली असून महापौर डिंपल मेहता यांनी पदभार स्वीकारल्यानंतर स्थायी समिती तसेच महिला व बालकल्याण समितीच्या सभापती निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यानुसार झालेल्या बैठकीत मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटीयार यांनी पिठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले. स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपकडून हसमुख गेहलोत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, तर काँग्रेस व शिवसेनेच्या संयुक्त मीरा-भाईंदर विकास आघाडीकडून अनिल सावंत यांनी उमेदवारी दिली होती. मतदानानंतर १६ सदस्यीय स्थायी समितीत भाजपच्या १३ सदस्यांच्या संख्याबळावर गेहलोत यांचा विजय झाला. तर आघाडीचे तीन मते अनिल सावंत यांच्या बाजूने पडली. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती व उपसभापतीपदासाठी विरोधकांकडून अर्ज दाखल न झाल्याने अनिता पाटील यांची सभापतीपदी आणि हेमा बेलानी यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600