जिल्हा
राज्यसभेसाठी मविआकडून शरद पवार
काँग्रेसचाही पाठिंबा, निवडणूक बिनविरोध होणार?
मुंबई: आज भाजपाने राज्यसभा निवडणुकीसाठी चार उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यानंतर आज महाविकास आघाडीकडून शरद पवार यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आली आहे.
राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ३७ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. या ३७ जागांपैकी महाराष्ट्रातील सात जागांचा समावेश असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे.
खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत शरद पवार यांच्या नावाची घोषणा केली आहे. शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाचा शरद पवार यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीसाठी पाठिंबा असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.
“महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाच्या राजकीय भूमिका होत्या. काँग्रेसने देखील राज्यसभा आम्हाला मिळावी अशी भावना व्यक्त केली होती. मात्र, नंतर आमची सविस्तर चर्चा झाली. चर्चेत आपण महाविकास आघाडीची भूमिका घेतली पाहिजे असं अधोरेखित झालं. त्यानंतर याबाबत मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्याशी चर्चा झाली. त्यानंतर आज काँग्रेसने शरद पवार यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. महाविकास आघाडी म्हणून आम्ही शरद पवार यांना मतदान करणार आहोत”, असं हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.
“आमचा राष्ट्रीय पक्ष आहे, त्यामुळे आम्ही राज्यसभेच्या जागेचा आग्रह धरला होता. राज्यसभेची जागा आम्हाला द्यावी आणि विधानपरिषदेची जागा उद्धव ठाकरे यांनी घ्यावी, अशी आमची मागणी होती. ही मागणी आम्ही पक्षाच्या हायकमांडकडेही मांडली होती. पण राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या काही नेत्यांनी दिल्लीत हायकमांडशी संपर्क केला, तसेच उद्धव ठाकरे यांच्याशीही संपर्क केला आणि त्यांची भूमिका मांडली. तसेच आमच्या प्रदेशाध्यक्षांशी देखील सुप्रिया सुळे यांनी चर्चा केली. त्यामुळे आमच्या पक्षाच्या हायकमांडने शरद पवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. आम्हाला आमच्या पक्षाच्या हायकमांडकडून फोन आला आणि त्यांच्याकडून सांगण्यात आलं की, शरद पवार यांना पाठिंबा देऊन त्यांना राज्यसभेवर पाठवलं पाहिजे”, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं.
राज्यसभेसाठी शरद पवारांना काँग्रेसने पाठिंबा दिल्यानंतर शिवसेना (ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली. संजय राऊत यांनी म्हटलं की, “काँग्रेसने महाराष्ट्रातील राज्यसभेबाबत अखेर निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडी एक आहे, एकत्र राहील, जय महाराष्ट्र!.”
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600