जिल्हा

आरटीओच्या तपासणीत ९४ टक्के रिक्षाचालकांना मराठीचे ज्ञान

आरटीओच्या तपासणीत ९४ टक्के रिक्षाचालकांना मराठीचे ज्ञान
आरटीओच्या तपासणीत ९४ टक्के रिक्षाचालकांना मराठीचे ज्ञान फोटो: ठाणे वैभव
२३१७ पैकी केवळ १४२ चालक अपात्र ठाणे: महाराष्ट्रात सार्वजनिक सेवेशी संबंधित प्रत्येक व्यक्तीला मराठी भाषेचे व्यवहारिक ज्ञान असावे, या राज्य शासनाच्या भूमिकेनुसार ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) रिक्षाचालकांची विशेष तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेत तब्बल २३१७ रिक्षाचालकांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी केवळ १४२ चालकांना मराठी भाषेचे व्यवहारिक ज्ञान नसल्याचे आढळून आले. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार राज्य शासनाने रिक्षा व टॅक्सी चालकांना स्थानिक भौगोलिक माहितीबरोबरच मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक केले आहे. त्यानुसार ठाणे आरटीओकडून शहरातील विविध भागांत विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत चालकांचे परवाने, बॅज, कागदपत्रांची पडताळणी करण्यासोबतच त्यांना मराठीत संवाद साधता येतो का, प्रवाशांनी सांगितलेले पत्ते समजतात का, तसेच दैनंदिन व्यवहार मराठीत करता येतात का, याचीही तपासणी करण्यात आली. प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या तपासणीदरम्यान बहुतांश रिक्षाचालकांना मराठीत सहज संवाद साधणे शक्य असल्याचे दिसून आले. त्यामुळे ठाणे शहरातील रिक्षाचालकांमध्ये मराठी भाषेबाबत जागरूकता वाढत असल्याचे सकारात्मक चित्र समोर आले आहे. सार्वजनिक वाहतूक सेवेत स्थानिक भाषेचा वापर वाढल्यास प्रवाशांनाही अधिक सुलभ आणि विश्वासार्ह सेवा मिळण्यास मदत होणार असल्याचे मत परिवहन विभागाकडून व्यक्त करण्यात आले. ज्या १४२ चालकांना मराठी भाषेचे व्यवहारिक ज्ञान नसल्याचे आढळले, त्यांना आवश्यक प्रशिक्षण घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शासनाच्या निर्देशानुसार अशा चालकांना मराठी भाषेचे प्रशिक्षण पूर्ण करावे लागणार आहे. तसेच बनावट कागदपत्रे, नियमभंग किंवा अपूर्ण माहिती आढळल्यास संबंधितांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली जाणार असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी सांगितले. बहुतांश रिक्षाचालकांना मराठीचे व्यवहारिक ज्ञान असल्याचे तपासणीत दिसून आले. ज्या चालकांना मराठी येत नाही, त्यांच्यासाठी मराठीचे धडे देण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी दिली.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600