जिल्हा
शहापूर तालुक्यात ७५० शेतकऱ्यांचे भाताचे पैसे रखडले
किन्हवली : शहापूर तालुक्यात मागील वर्षी भातखरेदी केल्यानंतर आदिवासी विकास महामंडळाकडून ७५० शेतकऱ्यांचे पैसे अद्याप खात्यात जमा करण्यात आले नाही. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेला शेतकरी निराश झाला आहे.
महामंडळाने व शासनाने तत्काळ याबाबत निर्णय घ्यावा अन्यथा शहापूर तालुक्यात शेतकऱ्यांचे बरं वाईट व्हायला वेळ लागणार नाही. दिवाळी आली तरी पैसे मिळत नसल्याने शेतकरी चिंताचूर झाला आहे. पिकवलेला भात महामंडळाला विकून सुद्धा पैसे मिळत नाही. त्यातच नवीन भात तयार झाला असून तो कधी विकला जाणार याची चिंता सुद्धा शेतकऱ्याला आहे.
शहापूर तालुक्यात एकूण सहा खरेदी केंद्रे होती. यात ३६१० शेतकऱ्यांनी भात दिला होता. एकूण ८३ हजार क्विंटल भात खरेदी करण्यात आला होता. माञ यातील ७५० शेतकऱ्यांचे भाताचे पैसे मिळाले नाहीत. पिकपेरा नसल्याचे कारण देत हे पैसे देण्यात आले नाहीत. भाताचे पैसे बाकी असणाऱ्या शेतकऱ्यांनी आदिवासी विकास महामंडळ, तहसीलदार, जिल्हाधिकारी यांना पत्रव्यवहार केला आहे. मात्र अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600