जिल्हा
ठाणेकरांना मेट्रोने दक्षिण मुंबई गाठणे होणार सुलभ
मध्य रेल्वेवरील ताण होणार कमी
ठाणे: मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मेट्रो ११ मार्गाला राज्य मंत्रीमंडळाने मंजुरी दिली आहे. वडाळा डेपो ते गेटवे ऑफ इंडिया या १६ किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिकेमुळे ठाण्याहून मेट्रो ४ ने निघालेल्या ठाणेकरांना वडाळा स्थानकातून मेट्रो ११ तून पुढे दक्षिण मुंबईपर्यंत प्रवास करणे सुलभ होणार आहे. यामुळे पर्यायी सेवा निर्माण झाल्याने मध्य रेल्वेवरील ताण कमी होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते थेट ठाणे, कल्याण, बदलापूर आणि कसारा- कर्जतपर्यंत मध्य रेल्वेचे जाळे पसरले आहे. दररोज लाखो प्रवासी जीव मुठीत घेऊन मध्य रेल्वेच्या लोकलने प्रवास करतात. लोकलचा हा भार कमी करण्यासाठी मुंबई-ठाण्यात मेट्रोचे जाळे विणले जात आहे. त्यापैकी मेट्रो ४ हा मार्ग वडाळा-घाटकोपर-ठाणे कासारवडवलीपर्यंत धावणार आहे. ठाण्यात या मार्गाची चाचपणी सप्टेंबर अखेरपर्यंत करण्याचे नियोजन असून त्या दृष्टीने काम सुरू आहे.
वर्षभरात ठाणे ते वडाळा असा प्रवास मेट्राने ठाणेकरांना करता येईल अशी अपेक्षा व्यक्त होत असताना आता ठाणे ते गेट वे ऑफ इंडीया व्हाया वडाळा स्थानक गाठणे शक्य होणार आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसीएल) च्या नवीन भूमिगत मेट्रो लाईन ११ मार्गामुळे हा प्रवास साध्य होणार आहे. राज्य मंत्रीमंळाने हिरवा कंदील या मेट्रो मार्गिकेला दिला आहे. वडाळा डेपो ते गेटवे ऑफ इंडिया या १६ किलोमीटर लांबीच्या पूर्ण भूमिगत मार्गिकेची उभारणी करण्यात येणार आहे. ही नवीन लाईन मेट्रो ४ (वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासरवडवली), अॅक्वा लाईन (लाईन ३-कफ परेड-बीकेसी-आरे जेव्हीएलआर), मोनोरेल आणि भायखळा आणि सीएसएमटीसारख्या उपनगरीय रेल्वे स्थानकांना जोडली जाणार आहेत. यामुळे प्रवाशांना सहज प्रवास करण्यास मदत होईल असा दावा प्राधिकरणाने केला आहे.
असा घडणार प्रवास
मेट्रो ११ मार्गिका वडाळा ते कासारवडवली मेट्रो ४ मार्गिकेला जोडली जाणार आहे. ठाणे ते गेट वे असा प्रवास करताना वडाळा येथील आणीक स्थानकात मेट्रो बदलावी लागेल. दक्षिण मुंबईतून आलेल्या प्रवाशांना मेट्रो ३ वरील वडाळा स्थानकात उतरून नजीकच्या मेट्रो ४ मर्गिकेच्या स्थानकावर गाडी पकडावी लागणार आहे. ठाणे ते वडाळा जमिनीवरचा तर वडाळा ते गेट वे ऑफ इंडीयापर्यंतचा प्रवास भमिगत होणार आहे. कॉफर्ड मार्वेâट, भेंडी बाजार, सीएसएमटी, वडाळा, शिवडी, रे रोडहून पश्चिमेकडे भायखळा, नागपाडा जंक्शन, भेंडी बाजार, क्रॉफर्ड मार्केट, सीएसएमटी, जीपीओ, हॉर्निमन सर्कल, गेट वे ऑफ इंडियाजवळ अपोलो बंदर अशी स्थानके मेट्रो ११ ची असणार आहेत. त्यामुळे मुख्य बाजारपेठ असलेले भेंडी बाजार, नागपाडा आणि मध्य रेल्वेवरचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलही मेट्रोने गाठता येणार आहे.
भविष्यात ठाणे मेट्रोला भिवंडी, कल्याण आणि बदलापूर मेट्रो जोडण्याचे नियोजन आहे. त्यामुळे नोकरी-धंद्यासाठी मध्य रेल्वेचे धक्के खात मुंबई गाठणार्या ठाणेपल्याड प्रवाशांना लवकरच मेट्रोचा सक्षम पर्याय उपलब्ध होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600