जिल्हा
महाविकास आघाडीतील अनेक आमदार संपर्कात
निकालानंतर शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांचा दावा
ठाणे : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालानंतर शिंदे आणि फडणवीस सरकारला दिलासा मिळाल्यानंतर ठाकरे गटातील उरलेले आमदार आणि खासदारही आमच्याकडे येतील त्याचसोबत महाविकास आघाडीतील आमदारही आमच्या संपर्कात असल्याचा दावा शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे शिंदे, फडणवीस सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचा गड असलेल्या ठाण्यात सकाळपासूनच कार्यकर्त्यांमध्ये निकालाबाबत उत्सुकता लागली होती. निकाल लागल्यानंतर ठाण्याचे जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी विरोधकांवर विशेष करून संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली. संजय राऊत यांचा सकाळचा भोंगा असा उल्लेख करत जे लोक सरकार पायउतार होणार असे बोलत होते त्यांना या निकालानंतर मोठी चपराक बसली आहे. संजय राऊत यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव टिपायला हवे होते, असा टोलाही म्हस्के यांनी राऊत यांना लगावला. विरोधकांकडून केवळ सहानुभूतीसाठी टीका होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
निकालानंतर शिवसेनेचा ठाण्यात जल्लोष
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गड असलेल्या ठाण्यात शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. ठाण्यातील टेंभी नाक्यावरील आनंद आश्रमाच्या बाहेर पेढे भरवून शिवसैनिकांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600