जिल्हा
समुद्र किनाऱ्यावर सापडले नवजात बाळ
समुद्र किनाऱ्यावर सापडले नवजात बाळ
फोटो: ठाणे वैभव
वसई: वसई पश्चिमेच्या कळंब समुद्रकिनाऱ्यावर नवजात बाळ आढळून आल्याचा प्रकार समोर आला आहे. बुधवारी सकाळी ५ च्या सुमारास ही घटना उघड झाली. सापडलेले बाळ हे स्त्री जातीचे असून तिला पोलिसांनी पालिकेच्या विरारच्या बोळींज रुग्णालयात उपचारासाठी ठेवण्यात आले आहे.
वसई पश्चिमेच्या भागात कळंब समुद्र किनारा आहे. याच किनाऱ्यावर सकाळच्या सुमारास प्रभात फेरीसाठी किनाऱ्यावर गेलेल्या नागरिकांना हे बाळ दिसून आले. त्यांनी त्या बाळाला उचलून घरी आणले व त्याची माहिती तातडीने पोलिसांना दिली.
माहिती मिळताच अर्नाळा सागरी पोलिसांनी घटना स्थळी पोहचून नवजात बाळ ताब्यात घेऊन वसई विरार महापालिकेच्या बोळींज येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हे बाळ नुकतेच जन्मले असून एक ते दोन दिवस झाले आहेत. सद्यस्थितीत बाळाची प्रकृती सुखरूप असल्याची माहिती अर्नाळा सागरी पोलिसांनी दिली आहे. तसेच या बाळाच्या आई वडिलांचा शोध आम्ही घेत आहोत, असेही पोलिसांनी सांगितले आहे. या नवजात बाळ अशा प्रकारे उघड्यावर टाकून दिल्याच्या घटनेमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
१० जुलै २०२५ रोजी कळंब गावात जाणाऱ्या खाडी पुलाजवळ रस्त्यालगत दुपारी एक व्यक्ती लघुशंका करण्यासाठी गेला होता. याच दरम्यान त्याला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात ठेवलेल्या प्लास्टिक पिशवीत नवजात बाळ रडत असल्याचे दिसून आले होते. ते बाळ दीड ते दोन महिन्यांचे होते. याच भागातील ही या वर्षातील दुसरी घटना आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600