जिल्हा
नऊ प्रभाग-नऊ पथके; बांधकामांचे तोडणार लचके!
अनधिकृत बांधकामांवर कारवाईसाठी ठामपाची तयारी
ठाणे: अनधिकृत बांधकामांवर कोणाचेच नियंत्रण राहिले नसल्याने न्यायालयाने महापालिका प्रशासनावर ठपका ठेवला आहे. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने ठाणे महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी नऊ प्रभाग समिती अंतर्गत नऊ पथके तयार करुन त्या-त्या भागातील अनधिकृत इमारतींवर कारवाईचा नारळ फोडला.
मुंब्रा-शिळ येथील हरित पट्ट्यावर उभ्या असलेल्या अनधिकृत १७ इमारतींवर कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने १२ जून रोजी दिले. त्यानंतर पालिका आयुक्तांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली. १७ पैकी आतापर्यंत १२ इमारतींवर कारवाई करण्यात आली आहे. तर, पाच इमारतधारकांना न्यायालयाच्या आदेशानुसार २३ जूनपर्यंत इमारत खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. न्यायालयाच्या निर्देशानुसार पुढील दिशा ठरवली जाईल असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
बुधवारी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात बैठक झाली त्यामध्ये, मुंब्रा, शिळ भागासह इतर प्रभाग समितीमधील अनधिकृत इमारती असल्याचा मुद्दा उपस्थित झाला. जेथे मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकाम झाले आहे अशा सर्वच प्रभाग समितीमधील अनधिकृत बांधकामांवर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी संबंधित प्रभाग समितींना दिले होते. त्यानंतर प्रत्येक प्रभाग समितीत नऊ जणांचे पथक तयार करण्यात आले असून त्यांच्यामार्फत आजपासून कारवाई हाती घेण्यात आली आहे. गुरुवारी एकाच वेळेस माजिवडा मानपाडा, वर्तकनगर, कळवा, नौपाडा आदी भागात कारवाईचा धडका सुरु करण्यात आला आहे.
दरम्यान, पहिल्या टप्यात ज्या ठिकाणी इमारतींचे काम नव्याने सुरु आहेत, त्या बांधकामांवर कारवाई केली जाणार आहे. त्यानंतर ज्या इमारती व्याप्त नाहीत, अशा इमारतींवर कारवाई करण्यात येणार असून तिसऱ्या टप्यात ज्या इमारती व्याप्त असतील अशा इमारत धारकांना नोटीस बजावून इमारती रिकाम्या केल्या जाणार आहेत. त्यानंतर त्यावर देखील कारवाई केली जाणार असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांनी दिली. याशिवाय त्या इमारतींचे पाणी आणि वीज कनेक्शन देखील तोडण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600