जिल्हा
नितेश राणे यांना एक महिना कारावासाची शिक्षा
नितेश राणे यांना एक महिना कारावासाची शिक्षा
फोटो: ठाणे वैभव
मुंबई-गोवा महामार्ग अभियंता चिखलफेक प्रकरणात न्यायालयाचा निकाल
सावंतवाडी: मुंबई-गोवा महामार्ग अभियंत्यावर चिखलफेक करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या बहुचर्चित प्रकरणात सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. मात्र, सार्वजनिक शांततेचा भंग करणे आणि इतरांना त्यास उद्युक्त करणे या कलमाखाली त्यांना दोषी धरून एक महिना कारावास आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही. एस. देशमुख यांनी आज हा निकाल दिला. या प्रकरणातील अन्य २९ संशयित आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. दरम्यान, या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात दाद मागितली जाणार असून, तोपर्यंत या शिक्षेला स्थगिती देण्यात आली असल्याची माहिती त्यांचे वकील ॲड. संग्राम देसाई यांनी दिली.
४ जुलै २०१९ रोजी मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाच्या कामाची पाहणी करण्यासाठी कणकवलीचे तत्कालीन आमदार नितेश राणे यांनी महामार्ग अभियंता प्रकाश शेडेकर यांना गडनदी पुलावर बोलावले होते. यावेळी कामाच्या दर्जाबाबत संताप व्यक्त करत शेडेकर यांच्या अंगावर चिखल ओतण्यात आला होता. तसेच त्यांना बांधून ठेवून चिखलातून चालत नेल्याची घटना घडली होती.
याप्रकरणी प्रकाश शेडेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आमदार नितेश राणे यांच्यासह एकूण ३० जणांवर भा.द.वि. कलम ३५३ (सरकारी कामात अडथळा), ३४२, १४७, ५०४, ५०६ आणि सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते.
दीर्घकाळ चाललेल्या या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त जिल्हा सरकारी अभियोक्ता रुपेश देसाई यांनी काम पाहिले. न्यायालयाने आज महत्त्वपूर्ण निकाल देत मुख्य कलमांतून राणे यांची मुक्तता केली, मात्र शांतता भंगाच्या प्रकरणात त्यांना शिक्षा सुनावली आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600