जिल्हा
एनएमएमटी आणि शाळेच्या बसला आग
एनएमएमटी आणि शाळेच्या बसला आग
फोटो: ठाणे वैभव
चालक, वाहक आणि नागरिकांच्या जागरुकतेमुळे जीवितहानी टळली
ठाणे: मुंब्रा भागात शाळेच्या आणि नवी मुंबई परिवहन विभागाच्या बसला आग लागल्याची घटना घडली असून वाहक, चालक आणि नागरिकांच्या जागरूकतेमुळे या दोन्ही दुर्घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही.
काल रात्री १.३०च्या दरम्यान नवी मुंबई महापालिका परिवहन विभागाची बस शिळफाटामार्गे कोपरखैरणे येथे जात होती. महापे पुलावरून जात असताना बसच्या टायरने अचानक पेट घेतल्याने आग लागल्याचे बसच्या पाठीमागून जाणाऱ्या कारमधील जागरूक नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी बसचालकाला ताबडतोब याबाबत माहिती दिली. बसचालक, नागरिक आणि वाहकांनी बसमधील अग्नीरोधक यंत्राच्या मदतीने ही आग काही मिनिटात आटोक्यात आणली. या बसमध्ये एकही प्रवासी नव्हता, परंतु बसचे नुकसान वाचविण्यात यश आले.
दुसऱ्या घटनेत मुंब्रा भागातील सिम्बॉयसिस शाळेची बस दुपारी २.३०च्या दरम्यान विद्यार्थ्यांना सोडून मुंब्रा येथे जात असताना मुंब्रा बायपास रोड, मुंब्रा देवी मंदिर येथे शॉर्टसर्किटमुळे आग लागली. आग लागल्याचे चालक आणि वाहकाच्या लक्षात येताच ते बसच्या खाली उतरले. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही, परंतु बस मात्र जळून खाक झाली आहे. मुंब्रा अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग अर्ध्या तासात आटोक्यात आणली.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600