जिल्हा
गृहसंकुलांना पाणी पाजण्यासाठी खासगी टँकर घेणार भाड्याने
गृहसंकुलांना पाणी पाजण्यासाठी खासगी टँकर घेणार भाड्याने
फोटो: ठाणे वैभव
ठाणे महापालिकेवर वार्षिक सव्वा कोटीचा बोजा
ठाणे: दिव्यासह उर्वरित ठाण्यातील लहान -मोठ्या गृहसंकुलांना खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने घेतला आहे. यासाठी भाडेतत्वावर खाजगी टँकर घेण्यात येणार असून महापालिकेवर वार्षिक सव्वा कोटींपेक्षा जास्त बोजा पडणार आहे.
उन्हाळाच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईचे चटके ठाणेकरांना बसू लागले असून अनेक खाजगी गृहसंकुलांमध्ये दररोजच टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे टँकर माफियांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्याचे समोर आले आहे. ठाणे शहरातील काही भागात आणि विशेष करून दिव्यात पाणीप्रश्न चांगलाच पेटला आहे. दिव्यात अनेक ठिकाणी मोठ्या गृहप्रकल्पांची कामे सुरु असून काही निर्माणाधीन आहेत तर मोठ्या संख्येने या ठिकाणी गृहसंकुले उभी देखील राहिली आहे. मात्र आता एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिकरण झाल्यानंतर या नागरिकांना पाणी देण्यास विकासक कुचकामी ठरल्याने आता ठाणे महापालिकेनेच या मोठ्या गृहसंकुलात खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.
दिवा प्रभाग समिती क्षेत्रातील गृहसंकुलांना वार्षिक २२६८ खाजगी टँकरच्या फेऱ्या करून हा पाणीपुरवठा केला जाणार आहे. तर ठाणे शहरातील माजिवडा, मानपाडा, वर्तकनगर, उथळसर, नौपाडा, कोपरी, वागळे इस्टेट अशा भागात देखील खाजगी टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जाणार आहे.
दिव्यासाठी २४ लाख ९४ हजार तर ठाणे शहरातील विविध भागांसाठी ८० लाखांची तरतूद खाजगी टँकर भाड्याने घेण्यासाठी करण्यात आली आहे. हा प्रस्ताव येणाऱ्या महासभेत मान्यतेसाठी ठेवण्यात आला असून या मुद्द्यावरून सभागृहात मात्र गदारोळ होण्याची शक्यता आहे.
एखाद्या विकासाला बांधकाम परवानगी देताना तो विकासक पाण्याची सुविधा देण्यास सक्षम आहे हे तपासल्यानंतरच बांधकाम परवानगी देण्यात येते. मात्र शहर विकास विभागाने सरसकट बांधकाम परवानगी कोणत्या आधारे या विकासकांना दिली आहे. आणि नागरिकांना पाणी न देताच वाऱ्यावर सोडणाऱ्या विकासकांवर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600