जिल्हा

बदलापुरात होणार जांभूळ मधाची निर्मिती

खादी ग्रामोद्योग महामंडळाचा पुढाकार बदलापूर: बहुपयोगी महत्व असलेल्या जांभूळ फळापासून मधाची निर्मिती करण्यासाठी खादी ग्रामोद्योग मंडळाने पुढाकार घेतला आहे. बदलापूर येथील प्रसिद्ध जांभळांना भौगोलिक मानांकन मिळवून देण्यासाठी येथील पर्यावरणप्रेमी आदित्य गोळे अनेक वर्षांपासून प्रयत्नशील आहेत, त्यासाठी त्यांनी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला आहे. याच पार्श्वभूमीवर खादी ग्रामोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविंद्र साठे यांनी आज सोमवारी बदलापूर परिसराला भेट दिली. आमदार किसन कथोरे याप्रसंगी उपस्थित होते. त्यावेळी बदलापुरात जांभळापासून मध निर्मिती प्रकल्प सुरू करण्याची घोषणा महामंडळाचे अध्यक्ष साठे यांनी केली. बदलापूर येथील जांभूळ मध प्रकल्पाला आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन आमदार कथोरे यांनी यावेळी दिले. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील मांगर जांभळाच्या मधाचे गाव म्हणून घोषीत झाले आहे. त्यानंतर बदलापूर हे जांभळाच्या मधाचे दुसरे गाव म्हणून विकसीत करण्याचा प्रयत्न महामंडळ करणार आहे. मधनिर्मिती प्रकल्पासाठी परिसरातील शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाईल. मधुमक्षिका पालन करण्यासाठी लागणाऱ्या पेट्या खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान दिले जाईल. त्याचप्रमाणे त्यांच्याकडे तयार होणारे मध महामंडळ हमीभावाने विकत घेईल, अशी ग्वाही श्री. साठे यांनी दिली. बदलापूर आणि परिसरात जांभळांची तब्बल 1300 झाडे आढळून आली आहेत. वन विभागामार्फत चामटोली परिसरात देण्यात आलेल्या 25 एकर जागेत तीन ते चार हजार जांभळांच्या रोपांची लागवड येत्या पावसाळ्यात करण्यात येणार आहे. काही वर्षात बदलापूर जांभळांचे उत्पादन अधिक प्रमाणात मिळेल, अशी माहिती श्री. गोळे यांनी दिली. नैसर्गिक मधाची नागरिकांना माहिती व्हावी यासाठी खादी ग्रामोद्योग महामंडळ मुंबई परिसरात मध महोत्सव आयोजित करणार असल्याची माहिती श्री. साठे यांनी दिली.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600