जिल्हा
शाळेत न जाता पोहोचल्या मारवाड रेल्वे स्थानकात
शाळेत न जाता पोहोचल्या मारवाड रेल्वे स्थानकात
फोटो: ठाणे वैभव
कल्याणमधील चार अल्पवयीन विद्यार्थीनींचा चार तासांत शोध
कल्याण : कल्याणमधील एका नामांकित शाळेतील चार अल्पवयीन विद्यार्थिनी अचानक बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली होती. शाळेसाठी निघालेल्या या चार मुलींची कुटुंबीयांनी शोध घेऊनही मुलींचा पत्ता न लागल्याने बाजारपेठ पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. अखेर चार तासांतच पोलिसांनी चौघींचा शोध घेतला असून त्या देवदर्शनासाठी थेट अजमेरला निघाल्याचे समोर आले आहे.
कल्याणमधील एका नामांकित शाळेतील चार अल्पवयीन मुली शाळेसाठी घराबाहेर पडल्या. मात्र त्या शाळेत न पोहोचल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. बराच वेळ शोध घेऊनही काहीच माहिती न मिळाल्याने बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. यातील दोन मुली आठवीत तर दोन मुली नववीत शिकणाऱ्या आहेत. तक्रार मिळताच पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, एसीपी अशोक होनमाने यांनी या मुलींच्या शोधण्यासाठी सहा पथक नेमली. या मुलींसोबत काहीही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी तपास पथकातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर या मुलींचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले. बाजारपेठ पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेतली. विविध तांत्रिक माध्यमांचा वापर करत अवघ्या काही तासांत पोलिसांनी चारही मुलींचा शोध लावला.
या चार मुली कल्याणहून एलटीटी रेल्वे स्थानकात गेल्या. त्यानंतर त्यांनी एरावली एक्सप्रेस पकडली. या संदर्भात राजस्थान येथील मारवाड रेल्वे स्थानकात या मुली पोहोचणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अखेर स्थानिक जीआरपी आणि आरपीएफला संपर्क साधला गेला. या चारही मुलींना तेथील जीआरपी आणि आरपीएफने आपल्या ताब्यात घेतले. बाजारपेठ पोलीस आता या चौघीना घेऊन कल्याणच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती कल्याणचे एसीपी अशोक होनमाने यांनी दिली आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600