जिल्हा
उल्हासनगरात 'वंचित'च्या साथीने शिवसेनेचा भगवा
उल्हासनगर: उल्हासनगर महापालिकेतील सत्तास्थापनेचा पेच अखेर सुटला असून 'किंगमेकर' ठरलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या निर्णायक भूमिकेमुळे शहरात शिवसेनेचाच महापौर बसणार हे आता स्पष्ट झाले आहे. रविवारी मध्यरात्री घडलेल्या वेगवान राजकीय घडामोडींनंतर वंचितच्या दोन नगरसेवकांनी शिंदे यांच्या शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिल्याने भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागणार असून, त्यांना आता विरोधी बाकांवर बसावे लागेल.
नुकत्याच झालेल्या ७८ सदस्यीय महापालिका निवडणुकीत भाजपने ३७ तर शिवसेनेने ३६ जागा जिंकल्या होत्या. बहुमतासाठी ४० आकड्याची गरज असताना कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. अशा स्थितीत पहिल्यांदाच महापालिकेत दोन जागांसह प्रवेश करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीचे महत्त्व वाढले होते. अखेर वंचितच्या नगरसेविका सुरेखा सोनावणे आणि नगरसेवक विकास खरात यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शिवसेनेला पाठिंबा देण्याचे अधिकृत पत्र सुपूर्द केले. या महत्वपूर्ण घडामोडीवेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी आणि शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
आपल्या प्रभागातील विकासकामांना गती देणे, दलित वस्ती सुधार योजना राबवणे आणि नागरी सुविधांचा प्रश्न मार्गी लावणे या अटीवर हा पाठिंबा देण्यात आल्याचे दोन्ही नगरसेवकांनी स्पष्ट केले. याआधीच साई पक्षाच्या एक नगरसेवक आणि एक अपक्ष नगरसेविकेने शिवसेनेला साथ दिली असल्याने, आता शिवसेनेचे संख्याबळ ४० वर पोहोचले असून त्यांनी बहुमताचा जादूई आकडा गाठला आहे. भाजपचा आकडा ३७ वरच थांबल्याने त्यांना सत्ता स्थापनेत अपयश आले आहे.
फोडाफोडीच्या राजकारणाची शक्यता लक्षात घेता, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विशेष खबरदारी घेत मित्रपक्षाच्या नगरसेवकांना सुरक्षित स्थळी हलवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. वंचितच्या या निर्णयामुळे उल्हासनगरच्या राजकारणाला नवी दिशा मिळाली असून, आगामी काळात शहरातील रखडलेले रस्ते, पाणी आणि मूलभूत पायाभूत सुविधांच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास शिवसेनेकडून व्यक्त केला जात आहे. या सत्तापालटामुळे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आगामी महापौर निवडीकडे लागले आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600