जिल्हा
शिवसेना मजबूत करणार ठाणे, कल्याण, भिवंडीचे बुरुज
संघटन वाढीसाठी दंड-बैठका सुरू
ठाणे: शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी संघटन वाढीसाठी राज्यात भाकरी फिरवण्यास घेतली आहे. त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ठाणे, कल्याण आणि भिवंडी या लोकसभा मतदारसंघांतील पदाधिकाऱ्यांच्या बैठक घेण्यास सुरुवात केली आहे.
शिवसेनेने पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी राज्यभर संपर्क प्रमुखांचे दौरे आणि लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठका सुरू करण्यात आल्या आहेत. त्यानुसार मुंबईत दोन दिवस सलग झालेल्या बैठकीनंतर बुधवारी ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, कल्याण आणि रात्री उशीरा ठाणे या तीन महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघांमध्ये या बैठका पार पडल्या. नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या संपर्क प्रमुखांना त्यांच्या जबाबदाऱ्या समजावून देत पक्ष संघटना तळागाळापर्यंत पोहोचवण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. प्रत्येक विभागात कार्यकर्त्यांशी समन्वय वाढवून पक्षाची पकड मजबूत करण्यासाठी नियोजनबद्ध काम सुरू असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
या बैठकीत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणी आणि विशेष पुर्ननिरीक्षण प्रक्रियेसंदर्भातही सविस्तर चर्चा करण्यात आली. मतदार याद्यांमधून एकाही पात्र मतदाराचे नाव वगळले जाऊ नये, तसेच कोणताही मतदार वंचित राहू नये, यासाठी पक्ष स्तरावर विशेष मोहीम राबवली जाणार आहे. यासाठी बूथनिहाय पदाधिकाऱ्यांची नियुक्ती, मतदारांशी थेट संपर्क आणि नावांची पडताळणी यावर भर देण्यात येत आहे. प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्या क्षेत्रातील मतदारांची माहिती अद्ययावत ठेवत त्यांच्याशी सतत संपर्कात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600