जिल्हा

कृत्रिम टंचाईने शहापुरात 'सुफला' साफ

कृत्रिम टंचाईने शहापुरात 'सुफला' साफ
कृत्रिम टंचाईने शहापुरात 'सुफला' साफ फोटो: ठाणे वैभव
खताच्या शोधात शेतकऱ्यांची ससेहोलपट शहापूर: खरीप हंगाम ऐन भरात असताना शहापूर तालुक्यात सुफला खताची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. भात लागवड, भाजीपाला आणि इतर पिकांसाठी आवश्यक असलेल्या सुफला खताच्या शोधात शेतकऱ्यांना एका दुकानातून दुसऱ्या दुकानात भटकंती करावी लागत असल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे. मात्र कृषी केंद्रामध्ये कोणत्याच खताची टंचाई नसल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकृत सूत्रांनी दिली. तालुक्यात खताची मागणी वाढलेली असतानाही अनेक कृषी सेवा केंद्रांवर सुफला खत उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. काही ठिकाणी खताचा साठा असूनही शेतकऱ्यांना पुरवठा होत नसल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे ही नैसर्गिक नव्हे तर कृत्रिम टंचाई असल्याची चर्चा शेतकरी वर्गात सुरू आहे. सध्या भात पिकाच्या वाढीसाठी खत देण्याचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. वेळेवर खत न मिळाल्यास पिकाच्या वाढीवर परिणाम होऊन उत्पादन घटण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. अनेक शेतकरी सकाळपासून कृषी सेवा केंद्रांवर जात असले तरी "साठा संपला", अशी उत्तरे मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप वाढत आहे. दरम्यान केंद्र सरकारने खरीप हंगामासाठी देशात खतांचा पुरेसा साठा असल्याचे सांगितले असून स्थानिक पातळीवर वितरण व्यवस्थेत अडचणी असल्यास त्यावर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश आहेत. तथापि कृषी विभागाने तालुक्यातील सर्व खत विक्रेत्यांच्या साठ्याची तपासणी करून कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी तसेच सुफला खताचा सुरळीत पुरवठा तातडीने सुरू करून शेतकऱ्यांना गरजेनुसार खत उपलब्ध करून द्यावे व कृषी विभागाने वितरणावर नियमित देखरेख ठेवावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. शहापूर तालुक्यात सुफला खताचा तुटवडा निर्माण झाल्याची बाब आता आमच्या निदर्शनास आली आहे. संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क साधून अतिरिक्त साठा उपलब्ध करून देण्याबाबत पाठपुरावा सुरू आहे. कोणत्याही शेतकऱ्याला खताअभावी अडचण येऊ नये यासाठी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. कृत्रिम टंचाई अथवा साठेबाजी आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल. शेतकऱ्यांनी घाबरून जादा प्रमाणात खताची खरेदी करू नये. तसेच कोणतीही तक्रार असल्यास कृषी विभागाशी तत्काळ संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी ईश्वर पाचे यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600