जिल्हा
सिव्हिल रुग्णालयात तीन वर्षांत १७,३३० यशस्वी शस्त्रक्रिया
सिव्हिल रुग्णालयात तीन वर्षांत १७,३३० यशस्वी शस्त्रक्रिया
फोटो: ठाणे वैभव
ठाणे : गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी ठाणे जिल्हा सामान्य (सिव्हिल) रुग्णालय हे विश्वासाचे आरोग्यकेंद्र बनत आहे. नव्या सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल इमारतीचे काम सुरू असल्याने वागळे इस्टेट येथील तात्पुरत्या जागेतून सेवा देतानाही रुग्णालयाने उपचारांचा दर्जा कायम ठेवत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
६ जून २०२३ ते ३० जून २०२६ या कालावधीत रुग्णालयात १७,३३० शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या. त्यामध्ये १०, ८२१ मोठ्या आणि ६,५०९ लहान शस्त्रक्रियांचा समावेश आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयात सर्वसामान्यांना खाजगी रुग्णालयांमध्ये लाखो रुपयांचा खर्च येणाऱ्या अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या जात आहेत. अलीकडेच ४९ वर्षीय महिलेवर पाठीच्या मणक्याची तीन तासांची अत्यंत गुंतागुंतीची स्पाईन शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. खाजगी रुग्णालयात लाखो रुपयांचा खर्च अपेक्षित असताना सिव्हिल रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे रुग्णाला नवे आयुष्य मिळाले. तसेच तंबाखूच्या सेवनामुळे जिभेच्या कर्करोगाने ग्रस्त असलेल्या ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिकावर कमांडो शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. ही अत्यंत क्लिष्ट शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने यशस्वीरीत्या पूर्ण करून रुग्णाला दिलासा दिला. याशिवाय, जन्मतः हाताची बोटे चिकटलेल्या सहा वर्षीय मुलीवर प्लास्टिक सर्जरीद्वारे पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया करून तिच्या आयुष्यात नवी आशा निर्माण करण्यात आली. आर्थिक परिस्थितीमुळे उपचार अशक्य वाटत असलेल्या अनेक रुग्णांसाठी सिव्हिल रुग्णालय खऱ्या अर्थाने आधारवड ठरत आहे.
रुग्णालयात लेप्रोटॉमी, हर्निया, सिझेरियन, अस्थिरोग, नेत्र, दंत, कान-नाक-घसा तसेच लेझर आणि दुर्बीणद्वारे विविध आधुनिक शस्त्रक्रिया नियमितपणे केल्या जात आहेत. तात्पुरत्या जागेतून सेवा सुरू असूनही उपचारांची गुणवत्ता, डॉक्टरांचे कौशल्य आणि रुग्णांविषयीची संवेदनशीलता यामुळे ठाणे सिव्हिल रुग्णालयाने सर्वसामान्यांचा विश्वास अधिक घट्ट झाला आहे. रुग्णालय तात्पुरत्या ठिकाणी असले तरी दर्जेदार आणि अखंड रुग्णसेवा देणे हेच आमचे ध्येय आहे. प्रत्येक रुग्णाला सर्वोत्तम उपचार मिळावेत यासाठी संपूर्ण वैद्यकीय पथक सातत्याने कार्यरत आहे, असे डॉ. कैलास पवार यांनी सांगितले.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600