जिल्हा
विद्यार्थी-तरुणांना पान टपऱ्यांमधून ड्रग्ज पुरवठा
विद्यार्थी-तरुणांना पान टपऱ्यांमधून ड्रग्ज पुरवठा
फोटो: ठाणे वैभव
* महासभेत नगरसेवकांचे गंभीर आरोप
* आजपासून शाळा, मंदिर रुग्णालयांजवळ अनधिकृत पानटपऱ्या, चायनीज स्टॉल्सवर कारवाईचा बुलडोझर
ठाणे : अनधिकृत स्टॉल्स, दुकानांमुळे शाळा, रुग्णालये, धार्मिक स्थळे आणि चित्रपटगृहांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी, अपघात अस्वच्छता आणि सामाजिक समस्या वाढत असून पानटपऱ्यांमधून विद्यार्थी आणि तरुणांना ड्रग्ज पुरवठा होत असल्याचा आरोप नगरसेवकांनी सोमवारी झालेल्या महासभेत केला. त्यामुळे मंगळवारपासून मुंब्र्यातून या टपऱ्यांवर कारवाईची मोहीम सुरू करण्यात येईल, अशी घोषणा आयुक्त सौरव राव यांनी केली.
ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहरातील शाळा, रुग्णालये आणि मंदिरांच्या परिसरातील अनधिकृत टपऱ्यांवरून जोरदार चर्चा झाली. शिवसेना (शिंदे गट ) पक्षाच्या नगरसेविका परिषा सरनाईक यांनी या परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत पानटपऱ्या, चिकन शॉप आणि चायनिज स्टॉल सुरू असल्याने वाहतूक कोंडी, अस्वच्छता आणि सामाजिक समस्या वाढत असल्याचा मुद्दा उपस्थित केला.
शाळांच्या परिसरातील पानटपऱ्यांमधून शालेय विद्यार्थी आणि युवकांना चॉकलेटच्या माध्यमातून ड्रग्ज पुरवले जात असल्याचा गंभीर आरोप परिषा सरनाईक यांनी केला. तसेच या टपऱ्यांभोवती सिगारेट आणि गुटखा सेवन करणाऱ्या तरुणांचा वावर वाढल्याने लहान मुलांवर विपरीत परिणाम होत असून तरुण पिढी व्यसनाधीनतेकडे वळत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली.
रुग्णालये आणि धार्मिक स्थळांच्या परिसरात फळे, फुले, नारळपाणी किंवा इतर आवश्यक वस्तूंची दुकाने असावीत. मात्र त्या ठिकाणी चिकन शॉप, चायनिज आणि पानटपऱ्यांचे वाढते प्रमाण तेथील शांत आणि पवित्र वातावरणाला बाधा पोहोचवत असल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले. या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही पत्र पाठविल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे नगरसेवक मनोज शिंदे यांनीही या मागणीला पाठिंबा देत काही टपऱ्यांमधून ड्रग्जची विक्री होत असल्याचा आरोप केला. पोलिसांकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याने अशा टपऱ्या पालिकेने तातडीने हटवाव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
या चर्चेला उत्तर देताना महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी घोषणा केली. शाळा, चित्रपटगृहे, सर्व धार्मिक स्थळे आणि रुग्णालयांच्या परिसरातील अनधिकृत टपऱ्यांवर मंगळवार, उद्यापासून विशेष मोहीम राबविण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली. ही कारवाई महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या समन्वयाने केली जाईल. तसेच मुंब्रा आमच्यासाठी वेगळा नाही, संपूर्ण ठाण्यासाठी एकच निकष असेल. या मोहिमेची सुरुवात मुंब्र्यातून करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600