महाराष्ट्र

उल्हासनगरात भाजपा-शिंदे गटात टेंडर वॉर?

टेंडर प्रक्रियेवरून दोन्ही गट पुन्हा आमनेसामने उल्हासनगर : गेल्या अनेक वर्षांपासून उल्हासनगर महापालिकेतील कंत्राटदार झा.पी. यांची कंपनी खोटी कागदपत्रे सादर करून कोट्यवधीचे कंत्राट घेत आहेत, यात महापालिकेचे भ्रष्ट अधिकारी आणि माजी महापौर लिलाबाई आशान यांचा पुत्र अरुण आशान सामील असल्याचा आरोप भाजपचे शहर अध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी केला आहे. दुसरीकडे आशान यांनी रामचंदानी यांनी केलेले आरोप म्हणजे 'चोराच्या उलट्या बोंबा' असल्याचे म्हटले आहे. उल्हासनगरातील भाजपा जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी हे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय असून शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख अरुण आशान हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खास मर्जीतले समजले जातात. उल्हासनगर शहरातील विकासकामाच्या टेंडर प्रक्रियेवरून हे दोन्ही पक्ष आमनेसामने आल्याची चर्चा शहरात सुरु आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये आता टेंडर वॉर सुरु झाल्याचे चित्र दिसून येत आहे. उल्हासनगर येथील भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत प्रदीप रामचंदानी यांनी हा आरोप केला आहे. यावेळी भाजप आमदार कुमार आयलानी, माजी महापौर मीना आयलानी, माजी नगरसेवक राजेश वधारिया, शेरी लुंड, डॉ. प्रकाश नाथानी, किशोर वनवारी व अन्य उपस्थित होते. झा.पी. ही कंपनी नियमबाह्य पध्दतीने काम करीत आहे. या संदर्भात महापालिका प्रशासनाकडे तक्रार करून झा.पी. कंपनीला ब्लॅकलिस्ट करावे तसेच या कंपनीच्या विरोधात 15 दिवसांच्या आत फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा अशी भाजपची मागणी असून जर ही कारवाई झाली नाही तर पक्षातर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपतर्फे देण्यात आला आहे. दुसरीकडे शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख अरुण आशान यांनी देखील पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. प्रदीप रामचंदानी यांनी आपल्यावर केलेले आरोप हे खोटे असून, त्यांचे आरोप म्हणजे "चोराच्या उलट्या बोंबा" असल्याची प्रतिक्रिया पत्रकारांना दिली. यावेळी अरुण आशान यांनी देखील रामचंदानी यांची कंपनी आयुक्तांनी काळ्या यादीत टाकली असल्याचे पत्र माध्यमासमोर दाखवले, तसेच रामचंदानी त्यांनी देखील महापालिकेत मोठा भ्रष्टाचार केल्याचे पुरावे सदर केले. भाजपा जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी ठेकेदार प्रेम झा यांच्यावर देखील भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत, यावर प्रतिक्रिया देतांना प्रेम झा यांनी सांगितले कि, प्रदीप रामचंदानी हे स्वतः माझ्या व्यवसायात २० टक्के पार्टनर आहेत, आमचा वाद हा एका टेंडर प्रक्रियेवरून असून रामचंदानी यांनी माझ्यावर केलेले आरोप खोटे असल्याचे स्पष्ट केले.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600