जिल्हा

ठामपाची नाले'कमाई'!

ठामपाची नाले'कमाई'!
ठामपाची नाले'कमाई'! फोटो: ठाणे वैभव
* ट्रीटेड सांडपाणी विकणार उद्योगांना
* उत्पन्नाबरोबरच पाणीटंचाई, खाडी प्रदूषणावर उपाय
ठाणे : एरव्ही भ्रष्टाचाराचे साधन आणि दुर्गंधीचे केंद्र म्हणून चर्चेत असलेल्या नाल्यांकडे उत्पन्नाचे साधन म्हणून पाहिले गेले तर आश्चर्य वाटू नये. ठाणे शहरातील सुमारे दोन डझन नाल्यांमधील दूषित सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते विकण्याचा व्यवसाय महापालिकेच्या अजेंड्यावर आहे. हे ट्रीटेड पाणी उद्योगांना विकण्यात येणार असून पाणी टंचाईबरोबरच खाडी प्रदूषणाचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात सुटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
गाजियाबाद शहराच्या धर्तीवर हा प्रकल्प उभारण्यात येणार असून त्यामुळे पालिकेला एक हजार लिटरमागे ४८ रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. विशेष म्हणजे हा प्रकल्प यशस्वी झाल्यास पिण्याच्या पाण्याची उद्योगांना लागणारी गरज कमी होणार असून नाल्यावाटे खाडीत मिसळणारे प्रदूषणही कमी होण्यास मदत होणार आहे.
ठाणे महापालिकेने नुकताच ६२२१ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे. हजारो कोटींच्या विकासाच्या तरतुदी या अर्थसंकल्पामध्ये असल्या तरी पालिकेवर असलेली २१०० कोटींची देणी हे मोठे आव्हान असणार आहे. त्यामुळे उत्पन्नवाढीसाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गाजियाबादच्या धर्तीवर पालिकेने नाल्यातील पाण्याचाही उत्पन्नवाढीसाठी उपयोग करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे.
आजच्या घडीला ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये २७८ किमी लांबीचे नाले आहेत. त्यापैकी १५० किमी नाले आरसीसी स्वरुपाचे असून १२८ नाल्यांचे बांधकाम बाकी आहे. या नाल्यांमधून दररोज लाखो लीटर सांडपाणी वाया जात आहे.
सध्या पालिका क्षेत्रामध्ये कोपरी, नागला बंदर, कोलशेत, माजीवाडा, हिरानंदानी इस्टेट, विटावा, मुंब्रा आणि खारीगाव अशा एकूण आठ मलजलशुद्धीकरण केंद्रांमध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. या केंद्रांमधील पाणी सध्या उद्यानांसाठी, रस्ते धुण्यासाठी वापरले जाते. उर्वरित पाणी मोठ्या प्रमाणात थेट खाडीत सोडले जाते.
महापालिका प्रशासनाच्या मते, या योजनेमुळे उद्योगांसाठी वापरले जाणारे पिण्याचे पाणी वाचवता येईल आणि ते नागरिकांसाठी उपलब्ध करता येईल. त्याचवेळी, सांडपाण्याच्या विक्रीतून पालिकेच्या महसुलातही भर पडेल. पालिकेचा दावा आहे की, या योजनेमुळे उद्योगांसाठी पुनर्वापरित पाण्याचा पर्याय उपलब्ध होईल, शहरातील पिण्याच्या पाण्यावरील ताण कमी होईल. मात्र, उद्योगांवर सक्तीचा निर्णय घेतल्यास त्यातून वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत, वापराच्या मर्यादांबाबत आणि अतिरिक्त खर्चाबाबत उद्योगांकडून प्रश्न उपस्थित होऊ शकतात.
सध्या शहरातील विविध केंद्रांमधून मोठ्या प्रमाणात पाणी पुनर्वापरासाठी उपलब्ध होत आहे. जवळपास २४१ दशलक्ष लिटर पाणी पुनर्वापरासाठी उपलब्ध होऊ शकते. मात्र यातील मोठा हिस्सा सध्या वापरात न येता वाया जात असल्याने त्याचे व्यावसायिक मूल्य उभे करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
चौकट १
काही महिन्यांपासून ठाणे-बोरिवली भुयारी मार्गाच्या कामासाठी मलजलशुद्धीकरण केंद्रांमध्ये केलेले ट्रीटेड पाणी ठाणे महापालिका विकत आहे. त्यामुळे नाल्यातील सांडपाण्यावर प्रक्रीया केलेले पाणी उद्योगांनाही विकता येऊ शकते या निष्कर्षावर पालिका प्रशासन आले आहे.
चौकट २
शहरातील २४ नाल्यांमधील पाणी वळवले जाणार असून त्यावर मलजलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया केले जाईल. या प्रकल्पासाठी सुमारे ७० कोटी ५३ लाखांचा खर्च अपेक्षित आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600