जिल्हा
चार दिवसांच्या मुसळधार पावसाचा ठाण्याला फटका
चार दिवसांच्या मुसळधार पावसाचा ठाण्याला फटका
फोटो: ठाणे वैभव
किसननगरमध्ये गॅलरी कोसळून दोघे जखमी; दिव्यात स्लॅब दुर्घटनेत पाच जणांची सुटका
ठाणे : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ठाणे शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शनिवारी रात्री किसननगर येथे इमारतीची गॅलरी कोसळून दोन जण जखमी झाले, तर रविवारी दिव्यातील साबे गाव परिसरात जिन्याचा स्लॅब कोसळल्याने दुसऱ्या मजल्यावर अडकलेल्या पाच जणांना अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापन विभागाने सुखरूप बाहेर काढत मोठा अनर्थ टाळला.
किसननगर-३ येथील तिवारी निवास या तळ अधिक दोन मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरीचा काही भाग शनिवारी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळला. त्यावेळी इमारतीखालून जात असलेले नुरी शेख (६५) आणि सुरेश थापा (३६) हे दोघे ढिगाऱ्याखाली सापडून जखमी झाले. नुरी शेख यांच्या डोक्याला व खांद्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सुरेश थापा यांना किरकोळ दुखापत झाली.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोकप्रतिनिधी नगरसेवक योगेश जानकर, नगरसेविका डॉ. दर्शना जानकर आणि नगरसेवक प्रकाश शिंदे यांनी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला कळविले. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या टेरेसवर राहणाऱ्या रहिवाशांना तत्काळ सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले.
दरम्यान, रविवारी दुपारी दिवा येथील साबे गावातील दत्त निवारा या दोन मजली इमारतीच्या जिन्याचा काही भाग अचानक कोसळला. त्यामुळे दुसऱ्या मजल्यावरील खोलीत राहणारे पाच जण अडकून पडले. याची माहिती मिळताच शिळ अग्निशमन केंद्राचे जवान आणि ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्परतेने बचावकार्य राबवत सर्व पाच जणांची सुखरूप सुटका केली. त्यानंतर त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.
गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील जुन्या व धोकादायक इमारतींबाबत नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. अशा इमारतींची तातडीने पाहणी करून आवश्यक ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. महापालिका प्रशासनानेही नागरिकांना धोकादायक इमारतींपासून दूर राहण्याचे आणि कोणतीही दुर्घटना दिसून आल्यास तत्काळ आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600