भर पावसात मानवी साखळी; वनक्षेत्र संरक्षित करण्याची जोरदार मागणी
ठाणे : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या ९४ एकर भूखंडावरील प्रस्तावित विकास आणि त्याबदल्यात दिल्या जाणाऱ्या टीडीआरविरोधात रविवारी ठाणेकरांनी भर पावसात रस्त्यावर उतरून मानवी साखळी आंदोलन केले. पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देत वनक्षेत्र अबाधित ठेवण्याची मागणी करत नागरिकांनी सरकार व प्रशासनाचे लक्ष वेधले. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या ९४ एकर भूखंडावर पार्क उभारण्याच्या प्रस्तावाला आणि त्याबदल्यात सुमारे २,८०० कोटी रुपयांच्या टीडीआर व्यवहाराला विरोध करत ठाणेकरांनी टिकुजी-नी-वाडी परिसरात मानवी साखळी उभारून जोरदार आंदोलन केले. "जंगल वाचवा, ठाणे वाचवा", "मुंबईचे फुफ्फुस वाचवा" आणि "विकासाच्या नावाखाली पर्यावरणाची हत्या थांबवा" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. संबंधित भूखंडावरील विकास प्रक्रियेला न्यायालयीन घडामोडी सुरू असतानाही गती देण्यात येत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. या व्यवहारात मोठ्या आर्थिक हितसंबंधांचा संशय व्यक्त होत असून, हा केवळ राजकीय विषय नसून मुंबई-ठाण्यातील लाखो नागरिकांच्या पर्यावरण आणि आरोग्याशी संबंधित प्रश्न असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाची पर्वा न करता सकाळी आठ वाजल्यापासून नागरिक टिकुजी-नी-वाडी परिसरात जमा झाले. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत टिकुजी-नी-वाडी ते खेवर चौकदरम्यान मानवी साखळी उभारली. आंदोलनादरम्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबई आणि ठाणे परिसरातील लाखो नागरिकांसाठी शुद्ध हवेचा प्रमुख स्रोत असून येथील समृद्ध जैवविविधता आणि वनसंपदा अबाधित ठेवणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. विकासाच्या नावाखाली जंगलाचा बळी देऊ नये, अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली. वन विभागाने संबंधित संपूर्ण जमीन वनक्षेत्र म्हणून संरक्षित करावी, विकास आराखड्यातील आरक्षणे रद्द करावीत तसेच फूटहिल्ससह सर्व वादग्रस्त प्रस्ताव मागे घ्यावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.'मुंबई-ठाण्याच्या फुफ्फुसांचे संरक्षण आवश्यक'
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे केवळ हिरवेगार जंगल नसून मुंबई आणि ठाणे परिसरातील लाखो नागरिकांसाठी शुद्ध हवेचा महत्त्वाचा स्रोत आहे. येथील दुर्मिळ वनस्पती, वन्यजीव आणि समृद्ध जैवविविधतेला धोका निर्माण करणारा कोणताही विकास भविष्यात गंभीर पर्यावरणीय संकट निर्माण करू शकतो. त्यामुळे हा परिसर कायमस्वरूपी संरक्षित ठेवण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.