जिल्हा

विक्रमी पावसात ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाची अग्निपरीक्षा

विक्रमी पावसात ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाची अग्निपरीक्षा
विक्रमी पावसात ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाची अग्निपरीक्षा फोटो: ठाणे वैभव
१० दिवसांत १,२७३ मिमी पावसात सातपट तक्रारींचा सामना ठाणे : यंदाच्या मान्सूनमध्ये अवघ्या दहा दिवसांत ठाणे शहरात १,२७३ मिमी पावसाची नोंद झाल्याने महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागासमोर अभूतपूर्व आव्हान उभे राहिले. मुसळधार पाऊस, ताशी ६० ते ७० किमी वेगाचे वारे आणि भरतीमुळे निर्माण झालेल्या पूरसदृश परिस्थितीत २०२५ च्या संपूर्ण मान्सून हंगामाच्या तुलनेत तब्बल सातपट अधिक तक्रारी प्राप्त झाल्या. मात्र मान्सूनपूर्व नियोजन, वाढीव पंप व्यवस्था, सीसीटीव्ही निगराणी आणि विविध यंत्रणांतील समन्वयाच्या जोरावर परिस्थिती प्रभावीपणे नियंत्रित करण्यात आल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. मान्सूनपूर्व नियोजनापासून ते प्रत्यक्ष आपत्ती व्यवस्थापनापर्यंत राबविण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे यंदाच्या विक्रमी पावसाचा सामना तुलनेने प्रभावीपणे करता आला. सखल भागांतील पंपांची संख्या ६६ वरून १०२ पर्यंत वाढवणे, नियंत्रण कक्षाशी सीसीटीव्ही नेटवर्क जोडणे, टीडीआरएफ आणि एनडीआरएफची सज्जता, तसेच २४ तास कार्यरत नियंत्रण कक्षांमुळे पाणी साचणे, झाडे कोसळणे, ड्रेनेज तुंबणे आणि इतर आपत्कालीन घटनांवर तातडीने प्रतिसाद देणे शक्य झाल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मान्सून सुरू होण्यापूर्वीच एप्रिल महिन्यात महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागप्रमुखांची विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत नालेसफाई, रस्त्यांची डागडुजी, धोकादायक झाडे, सखल भाग, आपत्कालीन यंत्रणा, आरोग्य विभाग, अग्निशमन दल तसेच इतर विभागांच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. गतवर्षीच्या अनुभवाच्या आधारे प्रत्येक विभागाला स्पष्ट जबाबदाऱ्या निश्चित करून वेळेत कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर मे महिन्यात रेल्वे, एमएमआरडीए, मेट्रो, महावितरण, टोरंट पॉवर, होमगार्ड, एअर फोर्स, विविध शासकीय संस्था आणि सामाजिक संघटनांसह संयुक्त समन्वय बैठक घेण्यात आली. आपत्तीच्या काळात कोणत्याही विभागामध्ये समन्वयाचा अभाव राहू नये, यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करण्यात आली. नागरिकांसाठी आपत्ती व्यवस्थापन संपर्क पुस्तिका, 'आपत्ती व्यवस्थापन आराखडा-२०२६', भरतीच्या वेळांची माहिती देणारे फलक आणि जनजागृती साहित्यही शहरभर वितरित करण्यात आले. आपत्ती व्यवस्थापन विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि ठाणे आपत्ती प्रतिसाद दल (टीडीआरएफ) यांना शोध, बचाव, सुटका, रॅपलिंग आणि बोट चालविण्याचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले. पुणे येथे एनडीआरएफच्या प्रशिक्षकांकडून टीडीआरएफच्या जवानांना रॅपलिंगचे प्रशिक्षणही देण्यात आले. त्यामुळे प्रत्यक्ष आपत्तीच्या वेळी प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध झाले. मान्सून सुरू झाल्यानंतर महापालिकेने आपली यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवली. नऊही प्रभाग समित्यांमध्ये २४ तास कार्यरत नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले. प्रत्येक प्रभागात अतिरिक्त मनुष्यबळ, जेसीबी, वाहने, पंप, जेटिंग मशीन आणि आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यात आली. आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षात वरिष्ठ अधिकाऱ्यांची तीन सत्रांमध्ये नियुक्ती करण्यात आली असून टीडीआरएफच्या स्वतंत्र दोन पथकांना सतत सज्ज ठेवण्यात आले. कार्डियाक ॲम्ब्युलन्स डॉक्टर आणि वॉर्डबॉयसह चोवीस तास उपलब्ध ठेवण्यात आली. ड्रेनेज तुंबल्याच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी जेटिंग वाहनेही सतत कार्यरत ठेवण्यात आली. अशा विविध जबाबदाऱ्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने पार पाडल्या. १ जुलैपासून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरएफ) एक तुकडी ठाण्यात दाखल करण्यात आली. विशेषत: दिवा परिसरात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन बोटी आणि अत्यावश्यक साहित्यांसह एनडीआरएफला अलर्ट मोडवर ठेवण्यात आले होते. २८ जून ते ७ जुलै या कालावधीत शहरात विक्रमी पाऊस झाला. ५ जुलै रोजी सर्वाधिक २०८.५३ मिमी, तर ४ जुलै रोजी १८४.६६ मिमी पावसाची नोंद झाली. या संपूर्ण कालावधीत आयएमडीने अतिवृष्टीसह ताशी ६० ते ७० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा इशारा दिला होता. परिणामी शहरात अनेक ठिकाणी झाडे व फांद्या कोसळल्या, तर भरतीमुळे सखल भागांत पाणी साचले. मात्र, पंप तातडीने सुरू करून पाण्याचा निचरा करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली. विशेष म्हणजे, प्रशासनाच्या आकडेवारीनुसार यंदाच्या केवळ दहा दिवसांत प्राप्त झालेल्या तक्रारींची संख्या ही २०२५ च्या संपूर्ण पाच महिन्यांच्या मान्सून हंगामातील तक्रारींपेक्षा सुमारे सातपट अधिक होती. त्यामुळे वृक्ष प्राधिकरण विभागाला अतिरिक्त मनुष्यबळ, यंत्रसामग्री आणि विशेष पथके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तसेच प्रत्येक प्रभागातील लोकप्रतिनिधींशी थेट संपर्क ठेवण्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, तक्रारींचा पाठपुरावा करून त्या तातडीने निकाली काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600