जिल्हा
मुंबई अपघातांची ठाण्याला भीती; १३५१ मॅनहोलची केली दुरुस्ती
मुंबई अपघातांची ठाण्याला भीती; १३५१ मॅनहोलची केली दुरुस्ती
फोटो: ठाणे वैभव
ठामपाकडून अडीच लाख मॅनहोलची तपासणी सुरू
ठाणे : मुंबईत उघड्या मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू झाला. या घटनेचा धसका ठाणेकरांनीही घेतला आहे. कारण ठाण्यात अनेक ठिकाणी मॅनहोलची झाकणे नादुरुस्त अवस्थेत असल्याचे आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने कंबर कसत शहरातील अडीच लाख मॅनहोलची तपासणी सुरू करण्यात आली आहे. तर १३५१ मॅनहोलची तुटलेली झाकणे बदलण्यात आली असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
मुंबईच्या दुर्घटनेनंतर ठाणे महापालिकाही धास्तावली असून मुंबईसारखी घटना ठाण्यात घडू नये यासाठी संपूर्ण ठाणे शहरातील मॅनहोलच्या तपासणीची मोहीम ठाणे महापालिकेने हाती घेतली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात दोन लाख ४८,१३६ मॅनहोलची संख्या आहे. एरवी या मॅनहोलकडे दुर्लक्ष करणाऱ्या ठाणे महापालिकेने मुंबईच्या घटनेनंतर गांभीर्यपूर्वक लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या मॅनहोलवर जाळ्या नाहीत किंवा ज्या मॅनहोलला दुरुस्तीची आवश्यकता आहे अशा मॅनहोलचा अहवाल तयार करून तत्काळ दुरुस्तीचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे शहरातील मॅनहोलच्या तपासणीला देखील सुरुवात करण्यात आली आहे.
ठाणे महापालिकेने मुंबईप्रमाणे ठाण्यातही अशा घटना घडू नयेत म्हणून पालिकेचे अधिकारी रस्त्यावर उतरल्याचे दिसत आहे. मॅनहोलची संख्या मोठी असल्याने प्रभाग समिती स्तरावर त्या त्या प्रभाग समितीच्या अभियंत्यांच्या माध्यमातून याची तपासणी सुरु करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शहरात आतापर्यंत १३५१ मॅनहोलच्या जाळ्या, झाकणे बदलण्यात आली आहेत. भर पावसातही ही कामे सुरू असल्याने ठाणेकरांनी समाधान व्यक्त केले आहे.
धोकादायक झाडे आणि फांद्या यांचे प्रमाण ठाण्यात मोठ्या प्रमाणात असून झाडे आणि फांद्या पडून यापूर्वी जीवितहानी झाल्याचे प्रकार घडले आहेत. वाहनांवरही झाडे कोसळून नुकसान होत असल्याच्या घटना घडत आहेत. अशावेळी नागरिकांच्या तक्रारीनंतर तातडीने धोकादायक वृक्षांची छाटणी करण्यात चालढकल होत असल्याचा आरोप नागरीकांकडून होत आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे मॅनहोलबाबत युध्दपातळीवर गांभीर्याने कार्यवाही सुरू करण्यात आली आहे, त्याचप्रमाणे धोकादायक झाडे आणि फांद्यांबाबत देखील महापालिकेने गांभीर्याने घेण्याची मागणी ठाणेकर करत आहेत.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600