जिल्हा
ठाण्यातील सिनेमागृहे झुकली वार्धक्याकडे
ठाण्यातील सिनेमागृहे झुकली वार्धक्याकडे
फोटो: ठाणे वैभव
पचास साल बाद...
ठाणे : तिकीट बारीवर चित्रपट पडतात याचा अनुभव रसिकांना येत असतो, पण ४०-५० वर्षे झालेली ठाण्यातील जक्खड सिनेमागृहे कधीही पडतील अशी भीती आता व्यक्त होऊ लागली आहे. विशेष म्हणजे चित्रपट प्रदर्शन बंद असलेल्या या वास्तूंचे स्ट्रक्चरल ऑडीटही झालेले नसून त्यात इतर व्यवसाय मात्र बेकायदेशीरपणे आणि बिनबोभाट चालू आहेत. त्यामुळे एखादी दुर्घटना घडलीच तर जीवितहानी होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे.
शहरातील ३० ते ५५ वर्षांहून अधिक जुन्या आनंद, वंदना, मल्हार आणि गणेश चित्रपटगृहांच्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिटच झाले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही चित्रपटगृहे बंद अवस्थेत आहेत चित्रपटांसाठी इथला पडदा बंद असला तरी इतर व्यावसायिक कारणांसाठी या चित्रपटगृहांच्या इमारतीचा वापर होत आहे विशेष म्हणजे, ठाणे महापालिकेच्या धोरणानुसार ३० वर्षांपेक्षा जुनी इमारत संरचनात्मक तपासणीच्या कक्षेत येते. मात्र, व्यावसायिक गाळे सुरू असतानाही स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल उपलब्ध नसल्याचे महापालिकेनेच मान्य केले आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी विचारलेल्या प्रश्नाला महापालिकेने दिलेल्या लेखी उत्तरातून हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. महापालिकेच्या उत्तरानुसार, गणेश चित्रपटगृहाला १२ जुलै १९६९, मल्हार चित्रपटगृहाला १३ ऑक्टोबर १९८१ रोजी बांधकाम परवानगी देण्यात आली होती. तर वंदना चित्रपटगृहाचे बांधकाम १९९७-९८ आणि आनंद चित्रपटगृहाचे बांधकाम १९९९ मध्ये झाल्याची उपलब्ध कागदपत्रांवरून नोंद आहे. म्हणजेच चारही इमारती ३० वर्षांच्या पुढे गेल्या असून, गणेश आणि मल्हार चित्रपटगृहे तर अनुक्रमे सुमारे ५७ आणि ४५ वर्षे जुनी आहेत. हिंदी मराठी भाषिक अनेक गाजलेल्या चित्रपटांचे हे चित्रपटगृह साक्षीदार ठरले होते. पण मल्टिप्लेक्सच्या ओघात ठाण्याची ओळख असलेले हे चित्रपटगृह बंद पडले. आजही ठाण्यातील अनेक परिसर या चित्रपटगृहांच्या नावामुळे ओळखले जातात. असे असले तरीही आता या चित्रपटगृहांच्या बांधकामाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
जुन्या आणि जीर्ण अवस्थेत असलेल्या या इमारतींचे नियमित स्ट्रक्चरल ऑडिट होणे अपेक्षित असताना, संबंधित विभागाकडे एकाही चित्रपटगृहाचा स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल उपलब्ध नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे या इमारतींची सद्यस्थिती सुरक्षित आहे की धोकादायक, याची अधिकृत नोंदच नसल्याचे समोर आले आहे. गंभीर बाब म्हणजे, चित्रपटगृहांच्या जागेत मॅरेज हॉल, जिम, वाहन शोरूम, लाऊंजसह विविध व्यावसायिक आस्थापने सुरू असल्याची माहिती प्रश्नातून उपस्थित करण्यात आली आहे. अशा वापरासाठी परवानगी दिल्याची नोंद संबंधित विभागाकडे उपलब्ध नसल्याचे महापालिकेने उत्तरात स्पष्ट केले आहे. चित्रपटगृहांच्या जागेचा 'वापर बदल' करण्यासाठी शहर विकास विभागाने परवानगी दिल्याची कोणतीही नोंदही उपलब्ध नसल्याचे प्रशासनाने कबूल केले आहे. त्यामुळे मूळ चित्रपटगृहाच्या वापरातून व्यावसायिक वापराकडे झालेला बदल कोणत्या परवानगीच्या आधारे झाला, हा प्रश्न अधिक गडद झाला आहे.
महापालिकेने उत्तरात यूडीसीपीआर-२०२० मधील तरतुदींचा उल्लेख केला असला, तरी संबंधित चित्रपटगृहांच्या जागांसाठी मॅरेज हॉल, जिम, शोरूम, लाऊंज आदी वापरांना परवानगी दिल्याची नोंद नसल्याचेही स्पष्ट केले आहे. अग्निसुरक्षेबाबत आनंद चित्रपटगृहाची अग्निशमन विभागाने आग प्रतिबंधक उपाययोजनांची तपासणी केली असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तर वंदना, मल्हार आणि गणेश ही चित्रपटगृहे सध्या बंद असल्याचे उत्तरात म्हटले आहे. मात्र, त्या जागांमध्ये सुरू असलेल्या इतर व्यावसायिक आस्थापनांच्या अग्निसुरक्षेच्या तपासणीबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. ही चित्रपटगृहे बंद असली तरी त्यांच्याकडून महापालिकेला मालमत्ता कर मिळत आहे. सन २०२५-२६ मध्ये आनंद टॉकीजने १५.८२ लाख रुपये, वंदनाने २.३२ लाख रुपये, मल्हारने ४.४० लाख रुपये, तर गणेश टॉकीजने २.८६ लाख रुपये मालमत्ता कर भरल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600