जिल्हा
नौपाडा-उथळसर प्रभागांचा भार आता मुख्यालयावर
नौपाडा-उथळसर प्रभागांचा भार आता मुख्यालयावर
फोटो: ठाणे वैभव
कर भरण्यासाठी नागरिकांची पायपीट
ठाणे: गावदेवी भाजी मंडईतील आग दुर्घटनेनंतर याच इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या नौपाडा-कोपरी प्रभागाचे कर संकलन बंद पडले असून येथील मालमत्ता कर भरणा केंद्र बंद पडले आहे. तर उथळसर प्रभागातील तांत्रिक बिघाडामुळे संगणक सेवा बंद पडल्याने या दोन्ही प्रभागांतील नागरिकांचा भार पालिका मुख्यालयावर पडू लागला आहे. त्यामुळे कर भरण्यासाठी नागरिकांना पालिका मुख्यालयापर्यंत पायपीट करावी लागत आहे.
ठाण्यातील गावदेवी भाजी मंडईच्या इमारतीत पहिल्या मजल्यावर पालिकेच्या नौपाडा-कोपरी प्रभाग समितीचे कार्यालय आहे. या ठिकाणी आग लागून मोठी दुर्घटना घडली. या कार्यालयाची साफसफाई आणि दुरुस्ती करून ते नव्याने उभारणीचे काम सुरू आहे. आग घटनेनंतर पालिकेच्या पहिल्या मजल्यावरील कार्यालय अद्याप बंद असून, तेथील मालमत्ता कर भरणा केंद्रही ठप्प झाले आहे.
उथळसर प्रभाग समिती कार्यालयातील तांत्रिक बिघाडामुळे संगणक सेवा बंद पडल्याने तेथील नागरिकांनाही कर भरण्यासाठी महापालिका मुख्यालयात धाव घ्यावी लागत आहे. परिणामी, एरवी कर भरण्यासाठी ३० ते ४० नागरिकांची वर्दळ असलेल्या मुख्यालयात आता दररोज शंभरहून अधिक नागरिक कर भरण्यासाठी येत असल्याने कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. कर भरण्यासाठी आलेल्या नागरिकांनी पर्यायी व्यवस्थेची मागणी केली असून, बंद असलेले केंद्र लवकर सुरू करावे तसेच उथळसर प्रभागातील तांत्रिक बिघाड तातडीने दुरुस्त करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. दरम्यान, पालिका प्रशासनाकडून सेवा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600