जिल्हा
विरुद्ध दिशेने येणाऱ्या चार वाहनांना कंटेनरची धडक
विरुद्ध दिशेने येणाऱ्या चार वाहनांना कंटेनरची धडक
फोटो: ठाणे वैभव
गायमुख घाटात विचित्र अपघात
ठाणे: गायमुख घाटातून वाहतुकीचे नियम डावलून विरुद्ध दिशेने प्रवास करणे वाहनचालकांना चांगलेच महाग पडले आहे. समोरून येणाऱ्या कंटेनरने या चारही वाहनांना धडक दिली. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नसली तरी, या अपघातात चार व्यक्ती जखमी झाल्या आहेत. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले.
शुक्रवारी सकाळी ७:४५ च्या सुमारास हा प्रकार घडला. या अपघातानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात तेल सांडले होते. तर ऐन सकाळीच हा अपघात झाल्याने गायमुख घाटात जवळपास दोन तास वाहतूक कोंडी झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी ७च्या सुमारास गायमुख जकात नाक्याजवळ, गायमुख घाट उतरणीला टाटा कंपनीचा कंटेनर (MH ०४ KF ०७९३ ) ३५ ते ४० टन सिमेंट गोणी घेऊन ठाण्याकडे येत होता. याचवेळी वाहतुकीचे नियम डावलून विरुद्ध दिशेने बोरिवलीकडे जाणाऱ्या ११ गाड्या या कंटेनर समोर आल्याने या ११ गाडयांना या कंटेनरने धडक दिली. कंटेनरच्या या धडकेत चार व्यक्ती जखमी झाल्या असून त्यांना जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शिवकुमार यादव (५६) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तस्किन शेख (४५) हे रिक्षामध्ये प्रवास करत होते. त्यांच्या चेहऱ्याला किरकोळ दुखापत झाली आहे. रामबली बाबूलाल (२२) यांच्या कमरेला गंभीर दुखापत झाली आहे तर अनिता पेरवाल (४५) या रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिलेच्या चेहऱ्याला किरकोळ दुखापत झाली आहे.
इतर वाहनांमध्ये देखील काही प्रवासी प्रवास करत होते. त्यांना किरकोळ दुखापत झाली असल्याने ते स्वतः खाजगी वाहनाने इतर रुग्णालयात उपचारासाठी गेले, अशी माहिती कासारवडवली पोलीस ठाण्याकडून देण्यात आली आहे.
या अपघातानंतर रस्त्यावर तेल सांडले होते. घटनास्थळी कासारवडवली पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी, शहर वाहतूक पोलीस कर्मचारी एक टोविंग मशीनसह, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी एक पिकअप वाहनासह, अग्निशमन दलाचे जवान रेस्क्यू वाहनासह उपस्थित होते
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600