जिल्हा
आपत्तीग्रस्त जखमींचा उपचार खर्च महापालिका उचलणार
आपत्तीग्रस्त जखमींचा उपचार खर्च महापालिका उचलणार
फोटो: ठाणे वैभव
खासगी रुग्णालयात दहा लाखांपर्यंतचा खर्च ठामपा करणार
ठाणे : शहरात होणारे रस्ते अपघात, नैसर्गिक आपत्ती यात अनेक नागरिक जखमी होतात, अनेकांना नाहक जीव गमवावा लागतो. अशावेळी जखमींना वेळीच अत्याधुनिक उपचार मिळावेत यासाठी ठाणे महापालिकेने खाजगी रुग्णालयातील १० लाखांपर्यंतचा उपचार खर्च उचलण्याचा निर्णय घेतला असून दोन कोटी रुपयांच्या 'आपत्कालीन रुग्ण उपचार निधी'ला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे जखमींच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
काही दिवसांपूर्वी लुईसवाडी येथे झाड कोसळून जखमी झालेल्या एका ज्येष्ठ नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर इमारतीची गॅलरी घरावर कोसळून बालकाचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले. झाड कोसळून झालेल्या विविध घटनांमध्ये तिघे जखमी झाले. यात एका महिलेचाही समावेश आहे. शहरात दरवर्षी अशा घटना घडतात. आशा जखमींना खाजगी रुग्णालयात अत्याधुनिक वैद्यकीय सेवा-सुविधा, उपचार घेणे परवडत नाही. त्यामुळे अनेकदा या जखमींना नाहक जीवास मुकावे लागते.
आतापर्यंत गंभीर जखमींना महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर न्यूरोसर्जरी, स्पाईन सर्जरीसारख्या विशेष उपचारांसाठी खासगी रुग्णालयात हलविण्याची वेळ येते. मात्र लाखो रुपयांचा खर्च परवडत नसल्याने अनेक रुग्णांच्या उपचारात विलंब होण्याची शक्यता निर्माण होत होती. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने आता वैद्यकीय विमा नसलेल्या आपत्तीग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयातील दहा लाख रुपयांपर्यंतचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
रुग्णाकडे वैद्यकीय विमा असल्यास प्रथम विम्यातून खर्च केला जाईल आणि उर्वरित रक्कम महापालिका अदा करणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अर्थसंकल्पात 'आपत्कालीन रुग्ण उपचार निधी' या नावाने स्वतंत्र लेखाशीर्ष तयार करण्यात आले असून त्यासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
खासगी रुग्णालयांकडून सादर होणाऱ्या उपचार बिलांची पडताळणी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त (१) यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत वैद्यकीय आरोग्य अधिकारी, मुख्य लेखा परीक्षक, मुख्य लेखा व वित्त अधिकारी आणि अधिष्ठाता यांचा समावेश असून समितीच्या शिफारशीनंतरच संबंधित रुग्णालयांना देयके अदा करण्यात येणार आहेत.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600