जिल्हा
टेमघरचे पाणी भिवंडीत मुरते; टंचाईची झळ ठाण्याला बसते!
टेमघरचे पाणी भिवंडीत मुरते; टंचाईची झळ ठाण्याला बसते!
फोटो: ठाणे वैभव
* रोज ६० एमएलडी पाण्याची चोरी
* राष्ट्रवादीकडून घोटाळा उघडकीस
ठाणे: पिसे ते टेमघर या दरम्यान ६० एमएलडी पाणीचोरी होत असून या संदर्भात पत्रव्यवहार करूनही मोठ्या प्रमाणात मलिदा मिळत असल्याने अधिकारी कारवाई करीत नाहीत, असा आरोप करून येत्या आठवडाभरात संबधित अधिकारी आणि पाणी चोरणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून ही पाणीचोरी थांबवावी; अन्यथा, पाणीचोरीसाठी लावण्यात आलेले टॅप उखडून टाकू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी पत्रकार परिषदेत दिला.
गेल्या काही महिन्यांपासून ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात पाणी कपात केली जात आहे. या पाणी कपातीमागील कारणांचा शोध घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने एक समिती नेमून पाणी गळती आणि पाणीचोरीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्या समितीच्या पाहणीमध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. त्याची माहिती मनोज प्रधान यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी शहर कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, युवक कार्याध्यक्ष राजेश कदम, मकसूद खान उपस्थित होते.
प्रधान म्हणाले की, ठाणे महानगर पालिका क्षेत्रात पाण्याचा पुरवठा करण्यासाठी भातसा नदीवरील पिसे येथील लघुधरणातून पाणी उचलून ते टेमघर येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणण्यात येते. शुद्ध केलेले हे पाणी माणकोली येथील एमबीआरमध्ये साठवून ते पुढे ठाणे शहरात वितरीत करण्यात येत असते. पिसे धरणातून ठाणे महानगर पालिका सुमारे २८० ते ३१० दशलक्ष लीटर पाणी उचलत आहे. मात्र, प्रत्यक्षात ठाणेकरांना २५० दशलक्ष लीटर पाण्याचा पुरवठा होत आहे. या मागे दररोज होणारी ६० दशलक्ष लीटर पाणीचोरी हे मुख्य कारण आहे.
पिसे ते टेमघर दरम्यान सोनाळे, चौधरपाडा, बापगाव, मुठवळ, सावद, आमनेपाडा, किरवली, पिसे आणि देवरूंग ही गावे आहेत. या गावांच्या परिसरात असलेल्या एअर व्हाॅल्वला बेकायदेशीरपणे टॅपिंग करण्यात आलेले आहेत. त्या माध्यमातूनच ही पाणीचोरी केली जात असल्याचे उघडकीस आले आहे.
देवरूंग नाला येथील जलवाहिनीवर अर्धा इंचाची जोडणी करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. मात्र, या ठिकाणी बेकायदेशीरपणे चार इंचाची जोडणी करण्यात आलेली आहे. मुठवल गावातील काही कंपन्यांना बेकायदेशीरपणे सहा इंचाची जोडणी देण्यात आलेली आहे. त्यामुळेच दररोज सुमारे ६० दशलक्ष लिटर्सची पाणीचोरी होत आहे. गेली नऊ वर्षे हा प्रकार सुरू आहे. दरमहा १८०० दशलक्ष लिटर्स याप्रमाणे वर्षाला २१,६०० आणि गेल्या नऊ वर्षात एक लाख ९४,४०० दशलक्ष लीटर पाण्याची चोरी केली जात आहे. कार्यकारी अभियंता आणि उपनगर अभियंता (प्रकल्प) यांच्या संगनमताने हा पाणीचोरीचा प्रकार सुरू असून त्यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक भ्रष्टाचार होत असल्याचा संशय आहे. त्यासाठीच पिसे ते टेमघर दरम्यान पाणीगणक यंत्रणाही बसविण्यात आलेली नाही, असेही मनोज प्रधान म्हणाले.
ही पाणीचोरी थांबवावी, यासाठी १६ ऑक्टोबर रोजी निवेदन दिले होते. त्यानंतर ३० ऑक्टोबर रोजी स्मरणपत्रही दिले आहे. मात्र, अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. दररोज होणाऱ्या ६० दशलक्ष लिटर्स पाण्याची चोरी रोखली तर एका विभागाची पाणीटंचाई कमी होऊ शकते. त्यामुळे संबधित अधिकारी आणि पाणी चोरणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा. येत्या आठवडाभरात जर ही बेकायदेशीर पाणी चोरी रोखली नाही तर त्या-त्या ठिकाणी जाऊन सर्व टॅप उखडू, असा इशाराही प्रधान यांनी दिला.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600