जिल्हा
शहापूरमधील हजारो हेक्टरवरील भातशेतीवर पाणी !
शहापूरमधील हजारो हेक्टरवरील भातशेतीवर पाणी !
फोटो: ठाणे वैभव
शहापूर : ठाणे जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसाचा सर्वाधिक फटका शहापूर तालुक्यातील भातशेतीला बसला आहे. सलग अनेक दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्व भागातील भातपेरणी पूर्णपणे पाण्याखाली गेली असून नव्याने केलेली पेरणीदेखील धोक्यात आली आहे. त्यामुळे खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.
शहापूर हा आदिवासीबहुल आणि भात पिकासाठी प्रसिद्ध तालुका असून येथील बहुतांश शेतकऱ्यांचे अर्थकारण भातशेतीवर अवलंबून आहे. अधिकृत कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार शहापूर तालुक्यात यंदा सुमारे १७ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील बहुतांश क्षेत्रात पेरणी पूर्ण झाली असताना अतिवृष्टीमुळे दोन दिवसांत ६१७.०० मि.मी. पाऊस झाल्याने अनेक शेतांमध्ये पाणी साचले आहे. भाताची रोपे दीर्घकाळ पाण्याखाली राहिल्यास रोपे कुजण्याची, मुळांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी होण्याची तसेच पुन्हा पेरणी करण्याची वेळ येण्याची भीती शेतकरी शिवाजी विर यांनी व्यक्त केली आहे. विशेषतः नदीकाठच्या आणि सखल भागातील शेतांमध्ये नुकसान अधिक असल्याचे चित्र आहे.
दरम्यान शेतकऱ्यांनी पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. कृषी विभागानेही शेतकऱ्यांना शेतातील पाण्याचा निचरा करण्याचे तसेच परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे. अतिवृष्टीचा जोर कायम राहिल्यास शहापूर तालुक्यातील भात उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत असून प्रशासनाने तातडीने सर्वेक्षण करून बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600