जिल्हा
कसारा घाटात दरड कोसळून वाहतूक ठप्प
कसारा घाटात दरड कोसळून वाहतूक ठप्प
फोटो: ठाणे वैभव
कसारा: सततच्या मुसळधार पावसामुळे मुंबई-नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात हिवाळा पॉईंटजवळ मंगळवारी मोठी दरड व मातीचा मलबा कोसळल्यामुळे मुंबईहून नाशिककडे जाणारी वाहतूक काही काळ एकेरी सुरु ठेवण्यात आली होती.
दरड कोसळल्याची माहिती मिळताच येथील शाम धुमाळ आणि सहकारी दत्ता वाताडे, लक्ष्मण वाघ यांनी घटनास्थळी धाव घेत वाहन चालकांना एकेरी वाहतूक करण्याचा मार्ग करून देत दरड हटविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांना कळविले. सकाळी ६ वाजता कोसळलेल्या दरडी हटवण्यासाठी १० वाजता यंत्रणा पोहोचली. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन टीम सदस्य व कसारा पोलीस निरिक्षक सुरेश गावित, हवालदार उमेश चौधरी, महामार्ग पोलीस घोटी यांच्या मदतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी दरडी हटवून रस्ता मोकळा केला.
दरम्यान यावेळी तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी कसारा घाटातील धोकादायक ठिकाणची पाहणी केली तसेच कोसळलेल्या दरडीचीही पाहणी केली.
नाशिक-मुंबई महामार्गवरील नवीन कसारा घाटात बिवळवाडी वळण व ब्रेक फेल पॉईंटलगत मोठ्या प्रमाणात मोठमोठ्या दरडींचा मलबा रस्त्यावर कोसळला तर काही ठिकाणी छोटे छोटे दगड रस्त्यावर खाली येत होते. दरम्यान दोन तासांच्या परिश्रमानंतर जेसीबीच्या मदतीने पोलिसांनी रस्त्यावरील दरडी, मातीचा मलबा दूर करीत वाहतूक पूर्ववत केली.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600