जिल्हा
'वज्रमूठ' सैल; सर्व सभा रद्द
मुंबई : राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन शरद पवार निवृत्त झाल्यानंतर आता त्याचा परिणाम राज्यातील महाविकास आघाडीवरही होत असल्याचे दिसून येत आहे. महाविकास आघाडीची वज्रमूठ सैल झाली असून पुण्यासह कोल्हापूर, नाशिक आणि अमरावती येथे नियोजित केलेल्या वज्रमूठ सभा रद्द झाल्यात जमा असल्याचे बोलले जात आहे.
पुण्यात 14 मे रोजी, कोल्हापुरात 28 मे रोजी, नाशिकला 3 जूनला तसेच 11 जूनला अमरावतीत नियोजित केलेल्या वज्रमूठ सभा रद्द झाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे. दरम्यान, शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्षपद सोडल्याच्या पार्श्वभूमीवर मविआच्या सभा रद्द होणे यावरून चर्चांना उधाण आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदावरून शरद पवार यांनी निवृत्ती जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा कोण सांभाळणार याबद्दल अद्याप प्रश्नचिन्ह आहे. पण या सगळ्या राजकीय घडामोडीचा फटका महाविकास आघाडीला पुढील काही दिवसात बसताना दिसणार अशी सध्याची राजकीय परिस्थिती दिसत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना एकत्र करण्यासाठी जी वज्रमूठ आवळली आहे हीच वज्रमूठ या घडामोडीमध्ये सैल झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अध्यक्षपदावरुन शरद पवार यांनी निवृत्ती जाहीर केली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा धक्का बसला. या धक्क्याचा परिणाम फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पुरताच सध्या तरी दिसत असला तर येणाऱ्या काही दिवसात याच धक्क्याचा परिणाम महाविकास आघाडीला सुद्धा जाणवणार असल्याचा चित्र दिसतंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा कोण सांभाळणार? शरद पवारांसारख्या अनुभवी नेतृत्वानंतर राष्ट्रवादीचे येणारे नेतृत्व मविआमध्ये पक्षाची भूमिका कशा पद्धतीने मांडणार? महाविकास आघाडीची वज्रमूठ आणखी घट्ट होणार की या सगळ्या घडामोडीमध्ये सैल होणार? असे अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
भाजपची केंद्रातून उचलबांगडी करायची असेल तर विरोधकांना एकत्र येऊन भाजपच्या आव्हानाचा सामना करावा लागेल असे वारंवार मविआकडून बोलले गेले. पण आता पवारच निवृत होत असल्याने विरोधकांची एकी 2024 मध्ये दिसेल का यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
महाविकास आघाडीचा आधारस्तंभ म्हणून शरद पवारांकडे पाहिले जातं आणि तेच अध्यक्षपदावरून निवृत्त होताय. मात्र निवृत्त होत असताना आपल्या पुस्तक प्रकाशनाच्या दरम्यान पुस्तकातून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदावर असताना त्यांच्या मंत्रालयातील उपस्थितीबाबत नाराजी व्यक्त केली. तर महाविकास आघाडी निर्माण होत असताना काँग्रेसच्या भूमिकेबद्दलसुद्धा भाष्य केलं. पुस्तकातील हे मजकूर महाविकास आघाडीत भविष्यात नाराजी निर्माण करणारे ठरू शकतात.
त्यामुळे सध्याच्या घडामोडी या फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापुरत्याच मर्यादित नाहीत, तर त्याचा मोठा परिणाम येत्या काळात महाविकास आघाडीवर होणार आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600